विरोधक फक्त श्रेय घेण्यासाठीच येतात ः तनपुरे वांबोरी चारीच्या दुरुस्तीवरुन विरोधकांवर केली टीका


नायक वृत्तसेवा, राहुरी
वांबोरी चारी व भागडा चारी जलजीवन पाणी योजना सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करायचे व श्रेय घेण्यासाठी विरोधकांनी पुढे यायचे. एकाच कामांची दोन-दोन उद्घाटने करण्याचे प्रकार राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघात होऊ लागल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली.

वांबोरी चारीच्या दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी उपलब्ध करून दिला. थकीत वीजबिल भरण्यासाठी आपण स्वतः व काही शेतकर्‍यांनी निधी दिल्याने सदर वीजबिल भरून वीजपुरवठा सुरू करून घेतला व वांबोरी चारीला पाणी सोडायचे तर श्रेय घेण्यासाठी वांबोरी चारीची कळ दाबायला दुसरेच पुढे आले. श्रेयवादाच्या लढाईत शेतकर्‍यांचे नुकसान व्हायला नको. वांबोरी चारीचे जसे झाले तसे आता भागडा चारीच्या बाबत होणार असून भागडा चारीच्या वीजबिल दुरुस्तीसाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वतंत्र तरतूद करून ठेवली होती.

या योजनेच्या थकीत बिलाचा प्रश्न उभा राहिल्यावर वांबोरी चारीच्या धर्तीवर आम्ही 30 ते 40 लाख रुपये भरले असून भागडा चारीला पाणी सोडण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असताना आता श्रेय घेण्यासाठी बटन दाबायला विरोधक पुढे येणार आहे. पण ऐन उन्हाळ्यात शेतकर्‍यांची जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये ही आमची भूमिका आजही आहे, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार तनपुरे म्हणाले, ज्यांच्या नावावर निवडून आले, मोठे झाले, त्यांनी पक्ष बदलला, त्यांच्यामागे कोण आहेत? किती आहेत? हे न पाहता निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यावर नाराजी व्यक्त करत जे आमदार खासदार निवडून येतात, ते कोणामुळे तर कार्यकर्ते, संघटनेमुळे हे विसरून ज्यांचे मागे कोणी नाही त्यांच्या ताब्यात पक्ष, चिन्ह देऊन निवडणूक आयोग मोकळे झाले असले तरी शेवटी न्याय हा जनतेच्या न्यायालयातच मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत जी सुनावणी सुरू आहे त्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांनी सांगितल्याप्रमाणे 21 जूनची स्थिती कायम राहिल्यास राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.

तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था पाहून मला मिळणारा 90 टक्के निधी मी रस्त्यांसाठी दिला असून त्यातील अनेक कामे मंजूर असून त्यातील काही कामांना राज्यातील स्थगिती सरकारने स्थगिती दिल्याने त्याविरोधात आपण उच्च न्यायालयात गेलो आहोत. यावेळी प्रेरणा ग्रुपचे संस्थापक सुरेश वाबळे, सरपंच उषा चंद्रे, उपसरपंच रवींद्र उर्हे, माजी सभापती मनीषा ओहळ, किरण कोळसे, रघुनाथ मुसमाडे, सुजीत वाबळे, बापूसाहेब कोंबरणे, मेजर कोळसे, अशोक चंद्रे, अविनाश ओहळ, पूनम कोळसे, अरुणा ओहळ, प्रीती कोळसे, रवींद्र कोळसे, राम बर्डे, नीलेश ओहळ, बबन वर्पे, बबन कोळसे, शौकत सय्यद आदी उपस्थित होते.

Visits: 215 Today: 1 Total: 1589909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *