यश मिळवण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्वाची असते ः पवार पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनात यश मिळवण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्वाची असते. त्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला मेहनतीने अभ्यास करण्याची सवय लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी के. के. पवार यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी के. के. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण दये हे होते. याप्रसंगी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अनिता निर्हाळी, सरपंच अनिल गायकवाड, सदस्या सुप्रिया दवंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ थिटमे, सदस्या सुनीता घुले, सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब गवांदे, मच्छिंद्र घुले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक श्रेया कडलग हिने केले. इयत्ता सातवीच्या 37 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लेखन साहित्य व गुलाबपुष्प देऊन निरोप देण्यात आला. आपली शिक्षणाची सुरुवात ज्या शाळेपासून झाली, ही शाळा सोडून दुसर्या शाळेत जायचं, या भावनेने मुलींना आपले अश्रू अनावर झाले होते. मयूरी उगले, हेमा गायकवाड, ओम पवार, प्रज्ञा गायकवाड, धनश्री कोल्हे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करून शाळा व शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी पवार यांचाही सेवापूर्तीनिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सुंदर कपाट भेट म्हणून दिले. तसेच व्ही-स्कूल अॅपमध्ये महाराष्ट्र राज्याच्या यादीत सहावा क्रमांक आल्याबद्दल इयत्ता सातवीतील विद्यार्थी ओम सोमनाथ पवार यास मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्यातर्फे एक मोबाईल संच बक्षीस म्हणून देण्यात आला. त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रप्रमुख विद्या भागवत यांनीही मुलांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ साबळे, वर्गशिक्षिका आशा घुले, रावसाहेब पावसे, सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, सोमनाथ मदने, ज्ञानदेव कोकणे, रमेश डोंगरे, राजेंद्र सूर्यवंशी आदिंनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी भाग्यश्री कोल्हे हिने केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी जाधव हिने केले. शाळेतील सर्व मुलांना वर्गशिक्षिका आशा घुले यांच्यावतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.