ब्राह्मणी येथे खताच्या गोणीत निघाली वाळू! शेतकर्यांकडून संताप; खतांमध्येही भेसळ उघड
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या रासायनिक खतात चक्क वाळूच निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ब्राह्मणी, उंबरे परिसरात दुधात भेसळ होत असल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असताना आता खतातही भेसळ होत असल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. अगोदरच रासायनिक खतांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना खतांमध्ये वाळू, खडे, माती असे भेसळ खते देऊन शेतकर्यांची फसवणूक व लूट होत असेल तर आता नेमके करायचं काय? असा संतापजनक सवाल शेतकरी वर्गात उपस्थित होत आहे. सध्या सर्वत्र कांदा पिकाला खते व फवारणी सुरू आहे. आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी खर्च का होईना, पण पिके चांगली येण्यासाठी महागडी खते, औषधांचा वापर करत आहे. त्यातच विविध कंपन्या व दुकानदारांकडून अशी फसवणूक होत असेल तर नेमका न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल होत आहे.
चेडगावमधील एका शेतकर्याने ब्राह्मणीमधील सर्वात जुने व कायम या-ना त्या कारणाने चर्चेत राहणार्या मोठ्या दुकानातून रासायनिक खत खरेदी केले. हे खत कांद्याला टाकण्यापूर्वी पाण्यात टाकून पाहिले. खत विरघळत नसल्याचे दिसून आले. हातात घेऊन पाहिले तर चक्क वाळू व मातीमिश्रित असल्याचे आढळून आले. शेतकर्याने दुकानदाराशी संपर्क केला. दुकानदाराने लागलीच खताची गोणी व बिल माघारी बोलावून रक्कम देऊन टाकली. अधिक चर्चा नको म्हणून गोणी अन् बिल माघारी घेतले. पुन्हा आता तुम्हाला खते मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले.
कृषी सेवा केंद्र चालक स्वतःच्या घरात खते तयार करत नाहीत, हे खरे आहे. पण आपल्याच शेतकरी बांधवांची फसवणूक होत असताना कंपनीला जाब विचारणे, अन्य शेतकर्यांची फसवणूक व तोटा होणार नाही, याची काळजी घेणे. शेतकर्यांशी सन्मानपूर्वक वागणे, आदराने बोलणे एवढे तर करू शकतात ना? असा टोला शेतकर्यांनी लगावला आहे.