धुळे येथील लाठीमार घटनेचा शिर्डीत निषेध
धुळे येथील लाठीमार घटनेचा शिर्डीत निषेध
नायक वृत्तसेवा, शिर्डी
धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यासाठी वेळ मागितला होता. परंतु विद्यार्थीहिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांवरच विना वर्दीतील पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा शिर्डी येथे आज (गुरुवार ता.27) निषेध करुन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात करावी, चुकीच्या लागलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करावे या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पोलिसांना हाताशी धरून विद्यार्थी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यावरुन हे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्याबाबत किती असंवेदनशील आहे, असा आरोप निवेदनातून केला आहे. सदर घटनेची योग्य चौकशी करावी, पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चेतन कोते, श्रृती तुरकणे, अक्षय महाजन, अक्षय गोंदकर, भाविन जोशी, मंगेश रानडे आदिंनी केली आहे.

