सहजयोग साधनेसाठी श्री निर्मलधाम आश्रमाचा लाभ घ्यावा ः कल्पनादीदी आरडगाव येथील श्री निर्मलधाम आश्रमात ध्यान मंडपाचे उद्घाटन


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील आरडगाव येथील श्री निर्मलधाम आश्रमात येऊन सहजयोग साधनेचा लाभ पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी परिसरातील सरपंच व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री माताजींच्या सुकन्या कल्पनादीदी यांनी केले.

आरडगाव येथील श्री निर्मलधाम आश्रमात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ध्यान मंडपाचे उद्घाटन नुकतेच कल्पनादीदी यांच्या हस्ते दोन हजार भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी द लाईफ इटर्नल ट्रस्ट मुंबई या ट्रस्टचे विश्वस्त श्री शर्मा, सदस्य प्रवीण जवळकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आरडगाव आश्रमाचे व्यवस्थापक श्री. बुगदे व त्यांच्या चमूमार्फत दोन दिवसांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर भजन संध्या व एकादश रूद्रपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुढे बोलताना कल्पनादीदी यांनी सांगितले की, आरडगाव या गावाला सहजयोगाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझी आई म्हणजेच श्री माताजी निर्मलादेवी यांनी सहजयोग ध्यान साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील म्हणजेच 1975 ते 1987 या कालावधीत प्रचार प्रसाराचे कार्य खूप मोठ्या प्रमाणात आरडगाव येथून सुरू केले होते आणि त्यानंतर सहजयोगाचा वृक्ष हा खर्‍या अर्थाने वटवृक्ष झाला. याप्रसंगी भजन संध्याच्या कार्यक्रमासाठी दिग्गज गायक दिनेश निंबाळकर, पं. अजित कडकडे, मुखीरामजी यांनी उपस्थिती नोंदविली व आपल्या सुरेल गायनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पवार व त्यांचे सहकार्‍यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक तरकसे यांनी केले.

Visits: 13 Today: 1 Total: 115963

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *