घराचे छत कोसळून आठ वर्षाच्या मुलीसह दोघे ठार! वेल्हाळ्यातील घटना; जेवण करताना घडला दुर्दैवी प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
माणसाच्या जीवनाला स्थैर्य देणारे घरं जेव्हा त्यात राहणार्या माणसांच्याच जीवावर उठते तेव्हा काय घडते हे दाखवणारी अतिशय वेदनादायी घटना शुक्रवारी रात्री संगमनेर तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेत जेवण करीत असलेल्या तिघांवर घराचे छत कोसळून त्यात एका आठ वर्षीय चिमुकलीसह 42 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून 68 वर्षीय वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. हृदय पिळवटून टाकणार्या या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली, मात्र त्या दोघांचे जीव मात्र वाचू शकले नाहीत.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शुक्रवारी (ता.3) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरानजीकच्या वेल्हाळे शिवारात घडला. येथील सोनवणे कुटुंब शेतीची कामे करुन काहीवेळ विसावल्यानंतर त्यातील लक्ष्मण चंद्रकांत सोनवणे (वय 42) व त्यांची आठ वर्षीय पुतणी सानिका हे दोघेही जेवणासाठी म्हणून घराच्या बाह्य बाजूला असलेल्या पडवीत आले. यावेळी मयत तरुणाची आई वैंजताबाई सोनवणे (वय 68) या त्या दोघांनाही वाढीत होत्या तर घरातील उर्वरीत मंडळी अन्य खोलीत होते.
लक्ष्मण व सानिका हे दोघेही शेजारी बसून जेवत असतानाच अचानक पडवीच्या पत्र्यावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला आणि काही कळण्याच्या आंतच दुसर्याच क्षणी पडवीचे संपूर्ण छत खाली कोसळले. त्या छताखाली थेट दाबले गेल्याने लख्मण आणि सानिका हे दोघेही गंभीर जखमी होवून त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला, चुलीजवळ असलेल्या वैजयंताबाई यांनाही गंभीर दुखापती झाल्या. सदरची घटना घडल्यानंतर घरातील अन्य माणसांसह आसपास राहणार्या रहिवाशांनी तत्काळ कोसळलेल्या पडवीकडे धाव घेत त्याचाली दाबल्या गेलेल्या तिघांनाही बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलविले. मात्र दुर्दैवाने या घटनेत लक्ष्मण व सानिका या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. काही वेळापूर्वी सर्वकाही आनंदात असतांना अचानक दुर्घटना घडली आणि त्यात कुटुंबातील दोघे मृत्यूमुखी पडले हा धक्का सोनवणे कुटुंबासाठी खूप मोठा आहे. या घटनेत जखमी झालेल्या वैंजताबाई सोनवणे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, पोलीस हवालदार विजय खाडे यांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. आज सकाळी दोन्ही मृतांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर वेल्हाळे येथे अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास हवालदार विजय खाडे करीत आहेत.