पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा ः चव्हाण सिन्नरच्या भिकुसा विद्यालयात उद्योजक आपल्या भेटीला प्रकल्प

नायक वृत्तसेवा, संगमनेर
20 लाख रुपयांनी तोट्यात असलेला व्यावसाय वार्षिक 100 कोटींचा होतो. आपत्ती आली तरी आपण सकारात्मक वृत्तीने सामोरे गेल्यास प्रगती होते. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहा, भावना जपून व्यवसाय करण्याऐवजी बुध्दी चातुर्याने करा, प्रत्येक संधीचा लाभ घ्या, आपला इगो शून्य करा, पैशांसाठी व्यवसाय करण्यापेक्षा उद्दिष्टांसाठी व्यवसाय करा असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य व साई ऍक्युम्युलेटर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेरचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश चव्हाण यांनी केले.

सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘उद्योजक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे होते. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात नीलेश चव्हाण पुढे म्हणाले, की व्यवसायासाठी योजना हवी. अनेक नवीन व्यवसाय सुरू होतात 100 पैकी 95 व्यवसायांमध्ये लोकांना अपयश येते. मात्र 5 टक्के लोक वेगळ्या योजनेनुसार व्यवसाय करतात. त्यांना यश प्राप्त होते. व्यवसायासाठी आत्मविश्वासच आपल्याला तारतो. आपल्या व्यवसायाची वेगळी ओळख आपण निर्माण केली पाहिजे त्यासाठी आपल्याकडे संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. आत्मविश्वासासाठी पैसे मोजावे लागत नाही. व्यवसायातील कर्मचार्यांना आपण जपले पाहिजे. पैशांसाठी व्यवसाय करण्याऐवजी उद्दिष्टांसाठी व्यवसाय करायला हवा. ज्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करतो त्याच गोष्टी आपण आकर्षित करतो म्हणून आपल्या डोक्यात नेहमी व्यवसायाचाच विचार हवा. आपत्ती आली तरी खचून न जाता नियतीने आपली परीक्षा बघितली आहे असे समजून आपण आपत्तीला सामोरे गेले पाहिजे. व्यवसायामध्ये वेळेची किंमत महत्त्वाची असते. व्यवसाय करत असतानाही आपण मित्र जपले पाहिजेत. आयुष्यात एखादी आपत्ती आल्यानंतर मित्रच संकट दूर करण्यासाठी खंबीरपणे उभे राहतात असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भिकुसा विद्यालयाच्या क्रीडाक्षेत्रातील दैदीप्यमान यशाबद्दल नीलेश चव्हाण यांनी क्रीडा शिक्षक रामनाथ जाधव व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात सुनील कडलग म्हणाले, प्रेरणादायी व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जीवनाला दीपस्तंभासारखे दिशादर्शन करेल म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे म्हणाले, स्पर्धेच्या युगामध्ये कौशल्य असतील तर आपण यश प्राप्त करू शकतो. विद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन उपक्रमातून विद्यार्थ्यांना जीवनाचा मार्ग मिळू शकतो. याप्रसंगी साक्षी बाहीकर, प्रगती घोरपडे, पायल होलगीर, दिव्या आंधळे, भगेश मोहिते, सुश्मित कोळगे, रोहित कापडणे, सुयोग गोरे, अस्मिता सांगळे, गौरव मगर आदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना नीलेश चव्हाण यांनी उत्तरे दिली. शीतल भसे यांनी आभार मानले.

