अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची कार्यकारिणी जाहीर संगमनेरचे गिर्यारोहक श्रीकांत कासट यांची राज्य कार्यकारिणीवर निवड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची राज्यस्तरीय वार्षिक आढावा आणि नियोजन बैठक इको सिटी घाटघर येथे 12 व 13 नोव्हेंबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी मंडळ व विविध जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. विविध गिर्यारोहण संस्थांची नोंदणी प्रक्रिया, सद्यस्थिती, गिर्यारोहण वाढीसाठी प्रयत्न, वन विभागाचे सहकार्य आणि महासंघाची पुढील वाटचाल याविषयी चर्चासत्र घेण्यात आले. तसेच पुढील तीन वर्षाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये संगमनेरचे ज्येष्ठ गिर्यारोहक श्रीकांत कासट यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाली आहे.
सदर अखिल गिर्यारोहण महासंघाची कार्यकारिणी ही सन 2022 ते 2025 कार्यकाळात काम करणार आहे. यामध्ये अध्यक्षपदी उमेश झिरपे (पुणे), कार्यकारी अध्यक्षपदी ऋषीकेश यादव (मुंबई उपनगर), उपाध्यक्षपदी राजन बागवे (मुंबई शहर), उपाध्यक्षपदी पद्माकर गायकवाड (रायगड), कार्यवाहपदी डॉ. राहुल वारंगे (रायगड), संयुक्त कार्यवाहपदी राहुल मेश्राम (मुंबई उपनगर), खजिनदारपदी दीपाली भोसले (मुंबई शहर), सहाय्यक खजिनदारपदी चंदन चव्हाण (पुणे), सदस्यपदी प्रकाश वाळवेकर (मुंबई शहर), भूषण हर्षे (पुणे), किरण देशमुख (मुंबई शहर), अभिजीत बर्मन (ठाणे), दीपक मोरे (पुणे), श्रीकांत कासट (अहमदनगर-संगमनेर), मिलिंद जोशी (मुंबई) यांचा समावेश आहे.
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही संस्था महाराष्ट्र राज्य सरकार मान्य गिर्यारोहणची शिखर संस्था आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेशजी झिरपे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार्या या संस्थेने सध्या अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेल्या गिरीभ्रमणाला मूळ संस्कारित गिर्यारोहणाची सवय लागावी, कुठेही अनुचित-अप्रिय घटना घडू नये, गिर्यारोहणासोबतच निसर्ग संवर्धन व्हावं, दुर्गसंवर्धन व्हावं, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ऐतिहासिक-अमूल्य खजिना जतन व्हावा यासाठी महासंघ आग्रही रहात आलेला आहे. दरम्यान, या बैठकीच्या दुसर्या सत्रामध्ये हरिश्चंद्र कळसूबाई अभयारण्याचे अधिकारी अमोल आडे आणि दत्तात्रय पडवळे यांनी वन विभागाच्यावतीने सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी गिर्यारोहकांना अपेक्षित ते सर्व सहकार्य करण्याविषयीचे वन विभागाने संकेत दिले. तसेच महासंघाच्या ‘रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरच्या’ क्रमांकाचे माहिती फलक वन विभागाकडे देण्यात आले. 7620230231 या 24 तास उपलब्ध असणार्या हेल्पलाईनच्या साहाय्याने सह्याद्री पर्वतांमधील दुर्गम भागात झालेल्या अपघातस्थळी लवकरात लवकर रेस्क्यू टीम आणि मदत पोहोचवली जाते. आयसीआरसी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या सौजन्याने बनवलेल्या या फलकांचे लोकार्पण करण्यात आले.