भाजप सोबतच्या कटू अनुभवामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ः गडाख शिवसंपर्क अभियानाचा श्रीरामपूरमध्ये प्रांरभ; भाजपवर केली टीका
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
‘शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, मागील पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कोरोनाच्या संकटात केंद्रातील सरकारसारख्या थाळ्या राज्य सरकारने वाजविल्या नाहीत, तर प्रामाणिकपणे काम करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले,’ असा दावा मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नुकताच शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मंगळवारी (ता.13) दुपारी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली.
मंत्री गडाख म्हणाले, ‘इतर राजकीय पक्ष निवडणुका समोर आल्यानंतर शेतकर्यांची खोटी कर्जमाफी करतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडविला. त्यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करीत जनतेला सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला’. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी प्रास्ताविक केले. उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आभार मानले.