आदिवासी भागात सर्रासपणे होतेय गुटख्याची विक्री तरुणाई गेली आहारी; पोलिसांचे मात्र होतेय दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी भागाची बाजारपेठ म्हणून उदयास येत असलेल्या भंडारदरा पर्यटनस्थळावर खुलेआम गुटखा विक्री सुरु असून तरुणाईला बिघडविणार्या गुटखा विके्रत्यांवर कारवाई कधी करणार? आणि यांना कुणाचे अभय आहे? असे संतप्त सवाल नागरिक करताना दिसत आहे.
भंडारदरा हे अतिमहत्वाचे पर्यटनस्थळ असून येथे सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. महाराष्ट्रात कायद्याने गुटखा विक्री करणे बंद आहे. तरी सुद्धा आदिवासी भागामध्ये पानटपरी, चहाची दुकाने, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान येथे तंबाखूजन्य मावा, विमल, हिरा, आरएमडी असे वेगवेगळ्या प्रकारचे गुटखा विकले जात आहे. या गुटख्यांचे व्यसन अगदी बारा-तेरा वर्षांच्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत दिसून येते. या गुटख्यांमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अति सेवनामुळे जेवताना सुद्धा तोंड उघडणे अवघड होऊन बसले आहे. याचबरोबर रिकाम्या पुड्या रस्त्यावर पडलेल्या दिसत आहे. शाळा आणि मंदिराच्या भिंती सुद्धा गुटख्यांचे सेवन करणार्यांकडून रंगीबेरंगी झाल्या आहेत.
गुटखा पर्यटनस्थळाबरोबरच शेंडी या मध्यवर्ती ठिकाणी मिळत असून ठराविक ठिकाणांवरुन तो होलसेल भावात विकला जाता. अगदी सहज गुटखा विक्रीला उपलब्ध होत असल्यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. शेंडी येथील स्थानिक स्वराज्य संस्थेकडून गेली कित्येक वर्ष गुटखाबंदी राबविली गेली. मात्र, तरी सुद्धा संस्थेचा आदेश झुगारुन दुकानदारांकडून खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. तसेच वारंघुशी फाट्यावर सुद्धा लाखोंची उलाढाल होत आहे. या गुटखा विके्रत्यांना नेमके कुणाचे अभय आहे? पोलीस प्रशासन विक्रेत्यांकडे का कानाडोळा करत आहे? अन्न व औषध प्रशासन देखील विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आर्थिक मिलीभगत तर नाही ना, त्यातूनच कारवाई होत नाही, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहे.