साळीवाड्यातील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची धूम पाच दिवस धार्मिक कार्यक्रम; गुरुवारी देवाचा लग्नसोहळा आणि महाप्रसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारो संगमनेरकर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साळीवाड्यातील स्वयंभू खंडोबा मंदिरात रविवारपासून चंपाषष्ठी षड्रात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात दररोजच्या महाआरतीसह जागरण-गोंधळ व भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. येत्या गुरुवारी खंडोबारायांचा लग्नसोहळाही होणार असून बुधवारी हळद दळण्याच्या विधीसह भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी लग्नविधीनंतर महाआरती व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून भाविकांनी कोविड नियमांचे पालन करुन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान सार्वजनिक ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

संगमनेरातील साळीवाड्यात असलेल्या खंडोबा मंदिराला मोठा इतिहास आहे. मंदिरालगतच्या आढ्यातून प्रकटलेल्या खंडोबारांची लगतच छोटेखानी मंदिर बांधून प्रतिष्ठापना करण्यात आली होती. होलमराजाच्या काळापासून उल्लेख असणार्‍या या जागृत ठिकाणचे व्यवस्थापन पाहण्यासाठी काही वर्षांपूर्वी सार्वजनिक विश्वस्त मंडळाची स्थापना झाली. त्या माध्यमातून भाविकांकडून लोकवर्गणी गोळा करुन विश्वस्त मंडळाने छोटेखानी मंदिराच्या जागी प्रशस्त मंदिराची निर्मिती केली असून त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मंदिरात नित्यनेमाने येणार्‍या भाविकांनी जिर्णोद्धारानंतर उभ्या राहणार्‍या या मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्याचाही संकल्प केला असून त्यासाठी भाविकांकडून सुवर्णदान मागितले जात आहे, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या मंदिरात दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र मागील वर्षी कोविड संक्रमणामुळे नियमांची मर्यादा असल्याने उत्सव झाला नव्हता. यावर्षी मात्र शासनाने राज्यातील सर्व मंदिरांची कवाडे खुली करण्यासह नियमांच्या अधीन राहून उत्सव साजरे करण्यास परवानगी दिली आहे. त्याचा आधार घेवून रविवारपासून साळीवाड्यातील खंडोबा मंदिरात खंडोबारायांचा चंपाषष्ठी षड्रात्रौत्सव व देवाचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाला रविवारपासून (ता.5) सुरुवात झाली असून सायंकाळी सात वाजता निवृत्त पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे यांच्या हस्ते महाआरती व शंकर बबन राहणे यांच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला.

आज सोमवारी सायंकाळी साडेसात ते अकरा यावेळेत महाआरती, रामदास गोविंद थिटे, सोमनाथ निवृत्ती ढेंबे व संतोष वामन थिटे यांच्या जागरण गोंधळासह साईप्रेरणा सत्संग मंडळाच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसात ते अकरा यावेळेत महाआरतीसह वेल्हाळे येथील किसन गोफणे यांच्या जागरणासह महेश सत्संग मंडळाच्यावतीने सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होईल. बुधवारी दुपारी चार ते सहा यावेळेत देवाच्या लग्नासाठी हळद दळण्याचा कार्यक्रम होईल त्यासोबतच भक्तीसंगीताचाही कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसात ते दहा यावेळेत शंकर रहाणे यांचे जागरण होईल.

उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी (ता.9) पहाटे पाच वाजता देवाला महालघुरुद्राभिषेक व महाआरती, सकाळी 9 वाजता देवाची सवाद्य शोभायात्रा, दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी देवाचा लग्नसोहळा, दुपारी 12.30 ते 3 यावेळेत महाप्रसाद व रात्री 8 वाजता महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात संगमनेरकर भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व देवाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान सार्वजनिक ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 156 Today: 1 Total: 1800667

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *