तहसीलदारांनी कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा करत दिला सुखद धक्का! ग्रामपंचायत निवडणूक निकालाची गडबड असतानाही दाखविला समन्वय

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निवडणूक निकालाची धामधूम, पाणी प्यायलाही वेळ नाही. अशातच तहसीलदार अमोल निकम यांनी एवढा कामाचा व्याप असताना देखील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कशा पद्धतीने समन्वय घडवून आणायचा असतो याचे उदाहरण दाखवून दिले आहे. मंगळवारी (ता.20) निवडणूक निकालाची गडबड सुरू असताना तहसीलदार अमोल निकम यांना निळवंडे गावच्या महिला तलाठी वर्षा आबासाहेब महाले यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. वर्षा महाले यांना हा एक आश्चर्याचा धक्काच होता! तर तहसीलदार निकम यांनी महिला तलाठी यांच्याबद्दल दाखविलेल्या आदराबद्दल अधिकारी व कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.

गेल्या तीन दिवसांपासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांना जेवायला देखील वेळ मिळत नव्हता. मंगळवारी सकाळी दहा वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांच्यासह नायब तहसीलदार गणेश तळेकर व उमाकांत कडनोर हे काम पाहत होते. मतमोजणीसाठी 125 ते 150 अधिकारी व कर्मचारी होते. यामध्ये महसूल विभागातील 22 महिला तलाठी व 4 मंडलाधिकारी (सर्कल) यांचा देखील समावेश होता. सकाळी सात वाजता हे सर्व अधिकारी व कर्मचारी याठिकाणी उपस्थित राहिले होते. एकूण 37 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करायचा होता. त्यामुळे सर्वजण तहान व भूक विसरून कामाला लागले होते. या निकालामध्ये जोर्वे, रहिमपूर, तळेगाव दिघे, कोल्हेवाडी, घुलेवाडी, निंबाळे, मालुंजे, अंभोरे या गावांचा देखील समावेश होता. या गावांमध्ये थोरात-विखे यांचा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांचा निकाल देताना अधिकारी व कर्मचारी यांना लक्ष केंद्रीत करुन काम करावे लागत होते. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम हे स्वत: मतमोजणीसाठी मांडण्यात आलेल्या 20 टेबलांवर प्रत्येक फेरीला जावून आढावा घेत होते.

दुपारी मतमोजणी संपल्यानंतर कर्मचारी चर्चा करत असताना त्यावेळी तहसीलदार अमोल निकम यांना समजले की, आपल्या महिला तलाठी वर्षा महाले यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी लगेच कार्यालयाचे शिपाई सोमनाथ काटे यांना केक आणण्यास सांगितले. दुपारी सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मतमोजणी झालेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये मध्यभागी तहसीलदार निकम यांनी एक टेबल टाकण्यास सांगितले आणि उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्याठिकाणी बोलावले. त्यानंतर या टेबलवर केक ठेवण्यात आला. सर्वांना वाटले की, आपण चांगले काम केले म्हणून तहसीलदार यांनी केक मागवला असेल, परंतु अचानक महिला तलाठी वर्षा महाले यांना तहसीलदार निकम यांनी पुढे बोलवत केक कापण्यास सांगत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. तर महिला तलाठी महाले यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. परंतु हा आनंद उपस्थित सर्वांनाच गगनात मावेनासा झाला होता. अशा पद्धतीने एक अधिकारी आपल्या सहकार्‍यांना प्रेमाने वागणूक देत असले तर प्रत्येक कर्मचार्‍याला असाच अधिकारी मिळावा अशा भावना उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी व्यक्त केल्या.

Visits: 3 Today: 1 Total: 23113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *