अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेत संघटनात्मक बदल! संगमनेरातही खांदेपालट; मुजीब शेख आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अहमदनगर जिल्ह्यात संघटनात्मक बदल केले असून विद्यमान तालुकाप्रमुखांना नारळ देत त्यांच्या जागी भाऊसाहेब हासे यांची वर्णी लावली आहे. तर कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणार्या मुजीब शेख यांना आता शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत सामावून घेण्यात आले असून त्यांच्यावर संगमनेर-अकोले तालुक्याच्या उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखपदी रावसाहेब खेवरे यांना कायम ठेवण्यात आले असून अप्पा केसेकर यांना शिर्डी विधानसभेच्या संघटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान शहरप्रमुख अमर कतारी व प्रसाद पवार यांची मात्र त्याच पदावर फेरनिवड करण्यात आली आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी काढलेल्या आदेशान्वये या नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उत्तर नगर जिल्ह्यासाठी दोन जिल्हाप्रमुख नेमण्याची पद्धत कायम ठेवण्यात आली असून विद्यमान जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याकडे असलेली संगमनेर, अकोले व शिर्डी तालुक्याची जबाबदारी यापुढेही कायम राहणार आहे असून कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यांसाठी प्रमोद लबडे यांची निवड करण्यात आली. राजेंद्र झावरे यांना कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा विधानसभेच्या सहसंपर्क प्रमुखपदी नेमण्यात आले आहे.
गेल्या दोन दशकांपासून भारतीय कामगार सेनेच्या विविध पदांवर काम करीत जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या संगमनेरच्या मुजीब शेख यांना आता शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर संगमनेर व अकोले विधानसभेच्या उपजिल्हा प्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर सेनेचे विद्यमान तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांना भाजपानेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी असलेली जवळीक भोवली असून त्यांना थेट नारळ देत त्यांच्या जागी आता भाऊसाहेब हासे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या संगमनेर-अकोले तालुक्याचे समन्वयक आप्पा केसेकर यांना बढती देण्यात आली असून त्यांना आता शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या जिल्हा संघटकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संगमनेर शहर शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यमान शहरप्रमुख अमर कतारी (शहर) व प्रसाद पवार (उपनगर) यांच्याकडे पूर्वी असलेली जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या शिवाय श्रीरामपूर तालुक्यासाठी दोन उपजिल्हाप्रमुख नेमण्यात आले असून शहर विभागासाठी शेखर दुभय्या व ग्रामीण भागासाठी देवीदास सोनवणे यांची व कोपरगाव, श्रीरामपूर व नेवाशाच्या संघटकपदी बाळासाहेब जाधव यांची निवड झाली आहे.
कोपरगाव शहरप्रमुख सनी वाघ, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, राहाता शहरप्रमुख भागवत लांडगे, तालुका प्रमुख सचिन कोते, अकोले शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, तालुका प्रमुख (पूर्व) डॉ. मनोज मोरे व पश्चिम संतोष मुर्तडक, श्रीरामपूर शहर प्रमुख अतुल शेटे, तालुका प्रमुख (पूर्व) दादा कोकणे व पश्चिम राधाकृष्ण बोरकर, कोपरगावचे शहर समन्वयक कलविंदर दडियाल, कोपरगाव विधानसभेचे संघटक म्हणून अस्लम शेख, राहाता शहर संघटक म्हणून गणेश होले व श्रीरामपूरच्या शहर संघटकपदी सचिन बडदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या परंपरेनुसार नूतन पदाधिकार्यांच्या पदांची घोषणा सामना दैनिकातून करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या नूतन निवडी जाहीर केल्या आहेत. सध्या पक्ष संक्रमणाच्या कालखंडातून जात आहे. अशावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी शिरसावंद्य मानून संघटना वाढीसह त्याच्या बळकटीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करणार आहोत. संगमनेर व अकोले विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांची मोठी संख्या असून त्या सर्वांना एका विचाराने एकत्र करुन आगामी कालावधीत होणार्या विविध निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देणार आहोत.
मुजीब शेख
उपजिल्हाप्रमुख – संगमनेर व अकोले