शहराला सुरक्षित ठेवणार्या पोलिसांचे कबिलेच बनलेत असुरक्षित! जुनाट वसाहत कधीही कोसळण्याची भीती; वाळू तस्करांकडून दररोज होतेय नशाबाजी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही वर्षांपूर्वी संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना हक्काचा निवारा देणार्या पोलीस वसाहतीला आता असंख्य समस्यांनी ग्रासले आहे. असंख्य अडचणींच्या विळख्यात अडकलेल्या या वसाहतीत विपरीत परिस्थितीतही जवळपास अर्धाडझन पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. गेल्या काही वर्षात पोलीस कारवायांमध्ये जप्त झालेली वाहनेही या वसाहतीत उभी केली जातात, त्यात वाळू तस्करांच्या वाहनांचाही समावेश आहे. आता तस्करांची हिच वाहने येथे राहणार्या पोलीस कर्मचार्यांसाठी डोकेदुखी ठरली असून वाहनाच्या संरक्षणाच्या नावाखाली चक्क वाळू तस्करांच्या टोळ्या पोलीस वसाहतीतच ठाण मांडून नशेबाजी करीत असल्याचे भयानक चित्र सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष पडझड झालेल्या खोल्या आणि गळकी छतं असूनही आनंदाने राहणार्या येथील पोलीस कर्मचार्यांना मात्र आता आपल्या कुटुंब कबिल्याच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे. वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी या गंभीर प्रश्नाकडे वेळीच लक्ष्य देण्याची गरजही यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.
संगमनेर तालुक्यातून पुणे-नाशिक या उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणार्या राष्ट्रीय महामार्गासह कोल्हार-घोटी राज्यमार्गही जात असल्याने व संगमनेर तालुक्याच्या सीमा थेट पुणे व नाशिक या जिल्ह्यांना खेटत असल्याने व्यावसायिक दृष्टीने संगमनेरचे महत्त्व शतपटीने वाढले आहे. मुळा व प्रवरा नदीच्या पाण्याने फुललेला येथील सहकार, उद्योग व व्यवसायामुळे जिल्ह्यातील सर्वाधीक प्रगत आणि पुढारलेल्या तालुक्यांच्या यादीत संगमनेरचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. भौगोलिक दृष्टीकोनातूनही तालुक्याचा मोठा विस्तार आहे. त्यामुळे तालुक्याचे चार भागात प्रशासकीय विभाजन करण्यात आले असून नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी चार स्वतंत्र पोलीस ठाणी कार्यान्वीत करण्यात आली असून त्यात पूर्वीच्या संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यांसह आश्वी व घारगाव पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे.
पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यात मिळून जवळपास दोनशे पोलीस कर्मचारी व डझनावर अधिकारी कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निवासासाठी सुमारे पाच-सात दशकांपूर्वी संगमनेरात पोलीस वसाहत निर्माण करण्यात आली होती. या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्तीस असलेल्या बहुतेक कर्मचार्यांसह येथून अकोले अथवा आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदलून गेलेले कर्मचारीही याच पोलीस वसाहतींमध्ये वर्षानुवर्ष वास्तव्यास राहिले. मात्र दोन दशकांपूर्वी तालुक्यात घारगाव व आश्वी ही आणखी दोन स्वतंत्र पोलीस ठाणी निर्माण करण्यात आली. त्यातच पूर्वी अकोले रस्त्यावरील मालपाणी यांच्या कारखान्याजवळ असलेले तालुका पोलीस ठाणे घुलेवाडी येथे हलविण्यात आले व तेथेच कर्मचार्यांसाठी निवास संकुलेही उभारण्यात आल्याने जुन्या वसाहतीत राहणार्या कर्मचार्यांना त्या इमारतीत खोल्या देण्यात आल्या.
मात्र त्यातील जवळपास सहा पोलीस कर्मचार्यांना नवीन वास्तुत घरेच शिल्लक नसल्याने त्यांचा मुक्काम आजही असंख्य अडचणींनी ग्रासलेल्या जुनाट, मोडकळीस आलेल्या आणि अतिशय धोकादायक अवस्थेत पोहोचलेल्या पोलीस वसाहतीतच आहे. पडलेल्या भिंती, गळकी छतं असंख्य असुविधा असूनही हक्काचा निवारा असल्याने येथे राहणार्या पोलीस कर्मचार्यांनी कधीही ओरड केली नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून या भौतिक अडचणींसह आता मानवी अडचणीही वाढू लागल्याने येथे राहणार्या पोलीस कर्मचार्यांचे जीवन अधिक खडतर बनले आहे.
पोलीस व तहसिल कार्यालयासाठी नवीन वास्तू उभी झाल्यानंतर त्या परिसरात पूर्वी जप्त केलेली वाहने वर्षोनुवर्ष उभी करण्याची पद्धत बंद करण्यात आली व तेथून सगळी वाहनं पोलीस वसाहतीमधील मोकळ्या जागी आणून उभी केली जावू लागली. आजच्या स्थितीत या वाहनांची मोठी दाटी पोलीस वसाहतीत झाली आहे. त्यातच वाळू तस्करांचे ट्रॅक्टर-ट्रॉल्या, डंपर, रिक्षा अशा वाहनांची संख्याही अलिकडे वाढल्याने या जप्त वाहनांचे स्पेअरपार्ट कोणी काढून नेवू नये यासाठी काही वाळू तस्कर चक्क पोलीस वसाहतीतच बेकायदा तळ ठोकीत आहे. त्यातही कहर म्हणजे फुकटच्या पैशांवर माजलेले हे वळू तेथे टोळीने बसून दारु, चरस व गांजासारख्या अंमली पदार्थांचेही सेवन करीत असल्याने येथे राहणार्या पोलिसांच्या मनात धडकी भरत आहे.
दिवस-रात्र कर्तव्यावर असलेल्या येथील पोलीस कर्मचार्यांची बायका-मुले याच वसाहतीत वावरत असल्याने या नशेबहाद्दरांकडून त्यांची सुरक्षाच आता धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे एरव्ही संपूर्ण शहराला सुरक्षेची हमी भरणार्या पोलिसांनाच आता असुरक्षित वाटू लागल्याने वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी या विषयाची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.