दिवंगत कामगार नेते सहाणे मास्तर म्हणजे साक्षात कर्मयोगी ः डॉ.मालपाणी मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कमध्ये पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘दिवंगत कामगार नेते सहाणे मास्तर म्हणजे साक्षात कर्मयोगी होते. कामगारांच्या सुखासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले’, अशा शब्दांत मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ.संजय मालपाणी यांनी दिवंगत कामगार नेते सहाणे मास्तर यांना आदरांजली वाहिली.
स्व.सहाणे मास्तर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त मालपाणी इंडस्ट्रीयल पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत बोलताना डॉ.मालपाणी यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश, संचालक मनीष, हर्षवर्धन मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप, कामगार नेते माधव नेहे, ज्ञानेश्वर सहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. मालपाणी उद्योग समूहातील कर्मचारी व अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाणे मास्तरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी पुष्पांजली वाहिली.
‘पुण्याची आणि पापाची नेमकी व्याख्या तरी काय आहे असा जर प्रश्न निर्माण झाला तर इतरांसाठी जे काहीतरी करून जातात त्या कर्माला पुण्यकर्म म्हंटले जाते. इतरांसाठी निःस्वार्थी भावनेने जे कार्य केले जाते त्याला पुण्यकार्य असे म्हटले जाते. असं करणार्या मंडळींची पुण्यतिथी साजरी केली जाते. सहाणे मास्तर यांनी आपलं संपूर्ण जीवन हे सहाणे सारखं सर्वांसाठी झिजवलं. त्या चंदनाचा सुवास मात्र इतरांना मिळत रहावा यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहिले म्हणून आपण त्यांचा पुण्यतिथी दिन साजरा करीत आहोत. त्यांच्या स्मरणानेही आपल्याला ऊर्जा मिळते’, असं सांगून त्यांचं जीवन हे खर्या अर्थाने एका कर्मयोग्याचे जीवन होतं. भगवद्गीता त्यांनी खर्या अर्थाने आचरणात आणली. गीतेतील तत्वानुसार आचरण करणे हे सोपे काम नाही त्याला प्रचंड ताकद लागते’, असे डॉ.मालपाणी यांनी शेवटी नमूद केले. यावेळी राजेश व मनीष मालपाणी यांचीही भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात सहाणे मास्तरांच्या जीवनकार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष राऊत व अर्चना मिश्रा व आभार प्रदर्शन कामगार प्रतिनिधी उमेश सोनसळे व चंद्रकांत आव्हाड यांनी केले.