देवळाली प्रवरा प्रसूती प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती पाच दिवसांत आरोग्य उपसंचालक यांच्याकडे अहवाल सादर करणार
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे रस्त्यावर महिलेच्या प्रसूती प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आली आहे. पाच दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यासाठी आरोग्य उपसंचालक यांच्याकडे स्वतंत्र अहवाल सादर केला जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
डॉ. सांगळे म्हणाले, घटनेच्या दुसर्या दिवशी दुपारी दोन वाजता देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. घटनेविषयी जनतेत प्रचंड रोष दिसला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांच्याविषयी तक्रारींचा सूर दिसला. याप्रकरणी चौकशीसाठी जिल्हा परिषदेेचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, सार्वजनिक आरोग्य परिचारक संदीप काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड यांची समिती नेमली आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत आरोग्य यंत्रणेने खूप चांगले काम केले. परंतु, अशा घटनांनी त्याला डाग लागला. आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे, असेही डॉ. सांगळे यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथे गुरुवारी (ता. 13) पहाटे सहा वाजता आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेतले नव्हते. आरोग्य केंद्राबाहेर रस्त्यावर महिलेची प्रसूती झाली. तसाच प्रकार दुसर्या दिवशी शुक्रवारी (ता. 14) चासनळी (ता. कोपरगाव) येथे घडला. दोन्ही घटना जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला व मानवतेला काळिमा फासणार्या ठरल्या. दोन्ही घटनांची चौकशी होऊन, दोषींवर कारवाई केली जाणार आहे. देवळाली प्रवरा येथे घटना घडल्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी निर्दोष आहेत, असे ठासून सांगितले. तसे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. त्यांची त्रिसदस्यीय समितीत नियुक्ती केली आहे. ज्यांनी अगोदरच आमचे कर्मचारी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. दोषींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून वस्तुस्थितीजन्य अहवाल अपेक्षित नाही. त्यामुळे, दोषींवर निलंबनाची कारवाई झाली नाही. तर येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राहुरी पंचायत समितीत रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.
आदेशाला केराची टोपली…
देवळाली प्रवरा येथे घटनेच्या दुसर्या दिवशी आमदार लहू कानडे व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आमदार कानडे यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सांगितले. अन्यथा स्वतः आरोग्य केंद्राला टाळे ठोकील, असा इशारा दिला. त्याकडे आरोग्य खात्याने दुर्लक्ष केले. चौकशी समिती नेमली. परंतु, वैद्यकीय अधिकार्यांना रजेवर पाठविले नाही. त्यामुळे आमदार कानडे कोणती भूमिका घेतात. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.