… तर पवारांची औलाद सांगणार नाही! उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कोपरगावकरांना चॅलेंज

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
‘आम्ही काही साधूसंत नाही, माणसंच आहोत. तरीही आम्ही कामं करतो आणि त्यावरून मतं मागतो. आता जी काही आश्वासनं दिली, ती पूर्ण करून दाखवणारच. नाही केली तर पवारांची औलाद सांगणार नाही. मात्र, त्याबदल्यात आम्हाला मताधिक्य देण्याची धमक तुम्ही दाखवणार का? घोडामैदान जवळच आहे, पाहू जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही काय दिवे लावता?’, असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावकरांना दिलं.

कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी (ता.6) आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याह पदाधिकारी, नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कोपरगाव आणि शिर्डी येथील विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं. याशिवाय आमदार काळे यांनी केलेल्या अनेक मागण्याही त्यांनी मान्य केल्या. त्यासाठीच्या निधीचीही घोषणा केली. तेथील कामांची जंत्रीच त्यांनी भाषणात सांगितली. त्यानंतर ते म्हणाले, ‘आम्ही एवढी कामं करतो, तेव्हा तुमच्याकडून मतांची अपेक्षा ठेवतो. आम्ही दरवेळी आमच्या मतदारसंघातून लाखांच्या मताधिक्यानं निवडून येत असतो. मात्र, तुलनेत तुम्ही येथे काळे यांना दिलेलं मताधिक्य कमी आहे. पुढीलवेळी ते वाढलं पाहिजे. आम्ही काही साधूसंत नाही, माणसंच आहोत. आम्ही कामं करतो, तुम्ही मताधिक्य द्या,’ असं आवाहन पवार यांनी करताच प्रेक्षकांमधून हात उचांवून ‘नक्की देणार’ असा प्रतिसाद मिळाला. त्यावर पवार पुढे म्हणाले, ‘पाहू ना आता काय करताय ते घोडा मैदान जवळच आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसेलच तुम्ही काय करता ते. आम्ही मात्र शब्दाचे पक्के आहोत. आमचे नेते शरद पवार वचनपूर्तीचे राजकारण करतात. मीही शब्दाचा पक्का आहे. आता सांगितलेली कामं नाही केली, तर पवारांची औलाद सांगणार नाही,’ असं ते म्हणाले.


अहमदनगर जिल्ह्यातील आजोळ असल्यानं येथील राजकारण लहानपणापासून पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा त्यांनी उल्लेख केला. दिवंगत नेते शंकरराव काळे यांच्यासोबत लोकसभेत काही काळ काम केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘फार थोड्या लोकांना आठवत असेल की, 1991 मध्ये मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो होतो. मात्र, मी सहा महिन्यांत राजीनामा द्यायचा आणि त्यानंतर त्या जागेवरून शरद पवार निवडून येणार असं ठरलं होतं. मात्र, या अल्पकाळात तरुणपणीच मला लोकसभेत जाण्याची आणि अनेक मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली होती,’ अशी आठवण पवार यांनी सांगितली.

Visits: 44 Today: 1 Total: 117179

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *