कोपरगाव शेतकी संघाचा खत विक्री परवाना निलंबित विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्हा कृषी अधीक्षकांची कारवाई
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील शेतकरी सहकारी संघाच्या खत विक्री केंद्रामध्ये त्रुटी आढळून आल्याने सदरचा खत विक्री परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. याबाबत खते परवाना अधिकारी तथा जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी आदेश काढले आहेत. यामुळे सहकार क्षेत्रासह कृषी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकरी सहकारी संघ लिमिटेड यांच्या खत विक्री केंद्राबाबत शरद मुरलीधर बळवंत (रा. बोलकी, ता. कोपरगाव) यांनी ऑनलाईन तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी 17 मे रोजी केंद्राला भेट देऊन तपासणी केली. तपासणीमध्ये एकाच खरेदीदाराचे नावे अधिक खत विक्री नोंदविणे, ई-पास मशीनचा वापर न करणे, खरेदी बिले उपलब्ध नसणे, साठा रजिस्टर व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री बिले विहित नमुन्यामध्ये नसणे, विक्री बिलांवर शेतकर्यांची स्वाक्षरी न घेणे तसेच सर्व मजकूर न लिहिणे, विक्री अहवालाच्या प्रती वरीष्ठ कार्यालयास सादर न करणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत.
यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक जगताप यांनी सदरचा खत व्यवसाय परवाना 2 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीसाठी निलंबित केला आहे. सदरचा आदेश मान्य नसल्यास विभागीय कृषी सहसंचालक, पुणे यांच्याकडे अपील दाखल करण्याचे आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, एकीकडे खरीप हंगामासाठी खत तुटवडा होत आहे, तर दुसरीकडे खताचा काळाबाजार होत असल्याने कृषी विभागाने गंभीरतेने दखल घेऊन पावले उचलण्याची गरज आहे.