रस्ता दुरुस्तीसाठी साकुरी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील साकुरी येथील गोदावरी वसाहत पाणी पुरवठा योजना ते रहाणे, दंडवते, बावके वस्ती जवळून जाणारा माळावरील रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी साकुरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंगळवारी (ता.23) ठिय्या आंदोलन केले.

गोदावरी वसाहत पाणी पुरवठा योजना ते माळावरील पाणी पुरवठा योजनेपर्यंत जाणार्‍या या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने काट्या झालेल्या आहेत. या रस्त्याने दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच महिलांची ये-जा असते. खराब रस्ता आणि दुतर्फा वाढलेल्या काट्यांमुळे याठिकाणी अनेक अपघात होतात. तरी ग्रामपंचायतीने सदर रस्त्याचे काम 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तात्काळ करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली असून, तसा ठरावही 16 नोव्हेंबर, 2021 रोजी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र तरीही या रस्त्याबाबत कुठलीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

या आंदोलनात दीपक दंडवते, सतीश बावके, अशोक बावके, विलास रोहोम, संदीप दंडवते, राहुल बावके, अमोल बावके, रवींद्र दंडवते, भानुदास रहाणे, पुंडलिक बावके, कानिफ बावके, मोहन बावके, सविता बावके, रंजना रहाणे, मंदा राहाणे, कविता दंडवते, आशा दंडवते आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान हा रस्ता अनेक वर्षांपासून वहिवाटीसाठी वापरला जात असून काही वर्षांपूर्वी यावर मुरुमीकरण देखील झाले होते. मात्र आता एका स्थानिक शेतकर्‍याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विरोध दर्शविला असून हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे समजते. सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या आग्रही भूमिकेमुळे तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यात येणार्‍या काट्या तोडण्याची सहमती संबंधिताने दर्शवली आहे. मात्र जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत या रस्त्यासंदर्भात कुठलीही कार्यवाही करू देणार नाही, अशी भूमिका संबंधिताने घेतली आहे. त्यामुळे आता परिसरात राहणार्‍या दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता साकुरी ग्रामपंचायत या प्रकरणात काय तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *