पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ‘एटीएम’चे संशयित जामिनावर सुटले! तपासी अधिकार्याची न्यायालयात अनुपस्थिती; 24 तासांतच झाला जामीन मंजूर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच वर्षांत संगमनेर तालुक्यात घडलेल्या असंख्य एटीएम फोडीच्या गुन्ह्याची उकल होईल असे वाटत असतानाच संगमनेर शहर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या 24 तासांतच तिघा संशयितांचा जामीन अर्ज मंजूर झाला. या प्रकरणाचा तपास देण्यात आलेला अधिकारी आरोपींना घेवून न्यायालयासमोर हजर होण्याऐवजी दुसर्या पोलिसांनी त्यांना हजर केले. त्यामुळे न्यायालयाने हाच धागा उपस्थित करीत तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविताना त्यांचे जामीन अर्जही तत्काळ मंजूर केले. या प्रकरणामुळे एकीकडे काही पोलीस कर्मचार्यांमधील निष्क्रीयता आजही कायम असल्याचे समोर येण्यासह हाताशी आलेली गुन्ह्याची उकल पुन्हा एकदा लांबली आहे.

मागील काही वर्षात सुरक्षा रक्षकाविना असलेले संगमनेर तालुक्यातील अनेक बँकांचे एटीएम सेंटर्स लक्ष्य करीत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी कोट्यवधी रुपयांची लुट केली. संगमनेरात चार-पाच वर्षांपूर्वी आलेले एटीएम फोडीचे हे लोण आता सर्वत्र पसरले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅसकटरचा वापर करुन नाशिक रोडवरील सह्याद्री महाविद्यालयाच्या परिसरातील एटीएम लक्ष्य केले होते. त्यातून कोट्यवधी रुपयांची लुटही झाली. त्यानंतर मालदाड रोड, घुलेवाडी परिसर व अध्यापक महाविद्यालयाजवळील एटीएम फोडून तशाच पद्धतीने लाखो रुपये लंपास केले गेले. त्या सर्व प्रकरणांच्या तपासात पोलिसांनी चोरट्यांचा माग काढतांना अगदी दिल्ली, हरयाणा व राजस्थानपर्यंत धाव घेतली. मात्र त्यांच्या हाती ठोस काही लागले नाही.

अर्थात बहुतेक ठिकाणी झालेल्या एटीएम चोरीच्या घटनेत चोरटे मालवाहतूक ट्रकने येवून लक्ष्य केलेल्या एटीएम समोरच आपले वाहन उभे करीत व त्याच्या आडोशाने सदरचे एटीएम फोडून वाहनातून पसार होत. या सर्व टोळ्या हरयाणा आणि राजस्थान या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागातील असल्याचेही त्यावेळी समोर आले होते. मात्र चोरट्यांचा नेमका माग काढणं पोलिसांना शक्य न झाल्याने शहर व तालुक्यात अशा दीड डझन घटना घडूनही त्यांचा तपास मात्र सुरुच होता.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी पदभार स्वीकारताच बासनात गुंडाळलेली स्थानिक पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण शाखा (डीबी) पुन्हा सुरु करुन मोठ्या आणि प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात केली. त्यातून महद् प्रयासातून नव्याने स्थापन झालेल्या प्रकटीकरण शाखेने वेगवेगळ्या एटीएम फोडीच्या घटनांचे सीसीटीव्ही फूटेज मिळवून त्याचे विश्लेषण करीत शहरातील अनिकेत गजानन मंडलिक (वय 19, रा.माळीवाडा) व सर्फराज राजू शेख (वय 20, रा.लालतारा वसाहत) या दोघांसह गुंजाळवाडी शिवारातील लक्ष्मीनगरमध्ये राहणार्या पोपट गणेश खरात (वय 22) या तिघांना सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

मंगळवारी त्या तिघांनाही न्यायालयासमोर हजर करुन पोलिसांनी त्या तिघांनीही एटीएम फोडण्याच्या घटना केल्याचा संशय असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र नियमानुसार आरोपी हजर करताना संबंधित प्रकरणाचे तपासी अधिकारी स्वतः न्यायालयात हजर असावे लागतात. या प्रकरणात मात्र तपासी अधिकार्याचा हलगर्जीपणा आडवा आला आणि त्यांनी या प्रकरणाशी संबंध नसलेल्या अन्य पोलीस कर्मचार्यांसह तिघाही आरोपींना न्यायालयात पाठविले. त्याचा परिणाम न्यायालयाने पोलिसांकडून करण्यात आलेली कोठडीची मागणी फेटाळून त्या तिघाही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली व त्यांच्या जामीन अर्जावरही तत्काळ निर्णय देताना त्या तिघांनाही जामीन मंजूर केला. या प्रकाराने शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अद्यापही यापूर्वीच्या पोलीस निरीक्षकांच्या निष्क्रीयतेच्या प्रभावात असल्याचे दिसून आले.

