अभ्यास दौर्याचा बहाणा की भाजप प्रवेशाची मशागत? आमदार सत्यजीत तांबेंचे ’मिशन मंत्रालय’; डझनभर नेत्यांच्या भेटीगाठींमागे दडलंय काय?..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे राजकीय बाळकडू आणि काँग्रेसच्या मुशीत जडणघडण झालेले नेतृत्व अशी ओळख असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. गेल्या आठवड्यात नूतन नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी केलेला ‘मुंबई महापालिका अभ्यास दौरा’ आणि त्यानंतर काल बुधवारी (ता.11) त्यांच्या पत्नी तथा नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्यासह मंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी, यामुळे तांबे यांच्या राजकीय भूमिकेविषयीचा संशय आता अधिक बळावला आहे. हा केवळ विकासकामांचा पाठपुरावा आहे की, भाजपच्या ‘महासागरात’ आपले राजकीय जहाज नांगरण्याचा प्रयत्न याचा आता राजकीय विश्लेषकांकडून शोध सुरु झाला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींपासून आमदार सत्यजीत तांबे यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. काँग्रेसने त्यांचे वडील डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केलेली असतानाही ऐनवेळी झालेली बंडाळी आणि सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून लढवलेली निवडणूक आणि त्याला भाजपची पडद्यामागून मिळालेली साथ जगजाहीर होती. तेव्हापासून ‘तांबे नक्की कोणाचे?’ हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या आठवड्यात (ता.4) मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास करण्याच्या नावाखाली त्यांनी संगमनेर सेवा समितीच्या सर्व नगरसेवकांना मुंबईची सफर घडवली. मात्र, या दौर्यात मुख्यमंत्र्यांसोबत झालेले फोटोसेशन आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी झालेली त्यांची ‘गुप्त खलबतं’ यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळाला ‘झिंग’ चढली होती.

गेल्या आठवड्यातील ‘त्या’ दौर्याची चर्चा अद्याप शमलेली नसतानाच, बुधवारी (ता.11) आमदार तांबे यांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे होत्या. वरकरणी हा दौरा विकासकामांसाठी आणि नूतन नगराध्यक्षांना राजकीय ‘एक्सपोजर’ देण्यासाठी असल्याचे भासविले जात असले, तरी भेटीसाठी मंत्र्यांची निवड पाहता हे राजकारण आता साधे राहिलेे नसल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, गणेश नाईक, दिलीप वळसे-पाटील, अब्दुल सत्तार अशा वजनदार नेत्यांशी त्यांनी बुधवारी आपल्या पत्नीसह संवाद साधला. विशेष म्हणजे, भाजपच्या युवा फळीतील आमदार नमिता मुंदडा, मोनिका राजळे आणि मंगेश चव्हाण यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. विरोधकांशी असलेला हा त्यांचा वाढता स्नेह आणि मंत्र्यांच्या दालनातील ‘उठबस’ संगमनेरच्या काँग्रेसनिष्ठ कार्यकर्त्यांना मात्र गोंधळात टाकणारी आहे.

आमदार तांबे यांचा गेल्या तीन वर्षांतील राजकीय प्रवास पाहता, ते सातत्याने भाजपच्या धुरिणांशी जवळीक साधताना दिसत आहेत. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत संबंध प्रस्थापित करण्यात हातखंडा असलेल्या तांबे यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या, यामागे केवळ निधी मिळवण्याचा हेतू नसून भाजपमध्ये जाण्यासाठी लागणारे पोषक वातावरण तयार करणे, हाच त्यामागील उद्देश असल्याचे आता बोलले जात आहे. आठवड्यापूर्वी नगरसेवकांसह मुंबईत घडलेले ‘शक्ती प्रदर्शन’ आणि आता त्यांची सपत्निक झालेली ‘मंत्रिमंडळ वारी’ पाहता, येत्या काही दिवसांत त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख जाहीर झाल्यास नवल वाटणार नाही.

थोरात-तांबे कुटुंबातील ही ‘राजकीय फाटाफूट’ संगमनेरकरांसाठी नवीन नाही, मात्र आमदार सत्यजीत तांबे यांची आजची चाल त्यांचे मामा, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाला ‘शह’ देणारी ठरणार की ‘पूरक’, याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. एकीकडे काँग्रेस विचारांचा पगडा आणि दुसरीकडे भाजपच्या नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, यातून आमदार तांबे यांच्या राजकीय जहाजाचा नांगर नेमका कोणत्या बंदरावर पडणार, याची संगमनेरकरांना मोठी उत्सुकता आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांचे राजकारण ‘अपेक्षित पण अनपेक्षित’ वळणांनी भरलेले आहे. संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी खेळलेल्या राजकीय खेळीचा पुढील अंक आता मुंबईच्या वार्यांमधून स्पष्टपणे समोर येत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे करण्यासाठी निधीची गरज असतेच, मात्र केवळ त्यासाठी ठराविक डझनभर मंत्री आणि नेत्यांच्या भेटी घेणे राजकीयदृष्ट्या संभ्रम निर्माण करणारे आहे. भाजपच्या काही राष्ट्रीय नेत्यांशी असलेले थेट संबंध आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी जवळीक पाहता, आमदार सत्यजीत तांबे आपल्यासाठी स्वतंत्र ‘राजकीय मार्ग’ तयार करीत असल्याचेही आता बोलले जात आहे.

संगमनेरच्या राजकारणात थोरात विरुद्ध विखे-पाटील असा संघर्ष गेल्या तीन पिढ्यांपासून चालत आला आहे. अशा स्थितीत आमदार सत्यजीत तांबे यांनी विखे-पाटील आणि इतर मंत्र्यांशी साधलेला संवाद भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाची पूर्वसूचना असल्याचे मानले जात आहे. भाजपमध्ये ‘थेट प्रवेश’ करण्याऐवजी ‘वैचारिक जवळीक’ निर्माण केल्यानंतरच पुढील राजकीय पाऊल टाकण्याची त्यांची निती असल्याचे आता हळुहळु समोर येवू लागले आहे, त्यातून त्यांचा भाजप प्रवेश कधी होणार याच्याही चर्चा रंगण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या नेत्यांशी होणार्या भेटी आणि संवादाची छायाचित्रे सोशल माध्यमातून ‘व्हायरल’ करण्याचा प्रकार त्या दिशेनेच जात असल्याचे बोलले जात आहे.

