इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात अकोलेत राष्ट्रवादीचे आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली अकोले बस स्थानकासमोर शनिवारी (ता.2) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी आमदार डॉ. लहामटे म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी तक्तालिन केंद्र सरकारच्या विरोधात महागाईच्या विरोधात रान उठवून सत्ता हस्तगत केली. परंतु मोदी सरकारच्या कालावधीत सर्वसामान्य माणूस गॅस व इंधन दरवाढीमुळे त्रस्त झाला आहे. पेट्रोल व डिझेलने शंभरी पार केल्याने आधीच महागाईने मेटाकुटीला आलेली जनता पुरती हैराण झाली आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदी केली. त्यामुळे काळापैसा बाहेर आला नाही उलट लाखो लघु उद्योग बंद होऊन हजारो तरुण नोकर्या जाऊन बेरोजगार झाले. महिलांसाठी उज्जवला गॅस योजना मोठा गाजावाजा करून आणली. परंतु गॅस दरवाढीमुळे महिलांना सिलिंडर भरणे मुश्कील झाल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. याचबरोबर ईडी व सीबीआय सारख्या संस्थांचा ससेमिरा राज्यातील विरोधी पक्ष सरकार विरोधात लावून भारताचा संघराज्याचा ढाचा उध्वस्त करत आहे.
या आंदोलनात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर व ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, सुरेश गडाख, विनोद हांडे, अशोक देशमुख, गुलाब शेवाळे, संपत नाईकवाडी, युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर, महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर, उज्ज्वला राऊत, जयश्री देशमुख, भागवत शेणकर, संतोष नाईकवाडी, अमित नाईकवाडी, संदीप शेणकर, सचिन पवार, विजय देशमुख, अभिजीत वाकचौरे, हरीश माने, सुभाष मालुंजकर आदी उपस्थित होते.

