मोरुच्या मावशीने उडविली संगमनेर फेस्टिव्हलमध्ये धमाल! संगमनेरच्या वैभवात भर घालणारा सांस्कृतिक महोत्सव ः तांबेे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
क्षणाक्षणाला उडणारे हास्याचे कारंजे आणि त्याला मिळत गेलेली टाळ्यांची जोड यातून सोमवारी संगमनेर फेस्टिव्हलच्या प्रांगणात मनोरंजनाची धमाल उडाली. गेल्या सहा दशकांपासून मराठी रंगभूमीवर तुफान गाजत असलेल्या आणि दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिकेने अजरामर झालेल्या ‘मोरुची मावशी’ या तुफान विनोदी नाटकाने संगमनेरकरांची हसवून हसवून पुरती वाट लावली. अभिनेता भरत जाधव यांनी साकारलेल्या मावशीच्या भूमिकेने रसिक अक्षरशः बेभान झाले होते. या नाटाकात सादर झालेल्या टांग टिंग टिंगा या गाण्याने तर भलताच भाव खाल्ला.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारा गणेशोत्सवा दरम्यान गेल्या 14 वर्षांपासून संगमनेरात सुरु असलेल्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये सोमवारी मराठी रंगभूमिवर तुफान गाजत असलेले ‘मोरुची मावशी’ हे विनोदी नाटक सादर झाले. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे होते. यावेळी संगमनेर फेस्टिव्हलचे जनक मनिष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी व कोषाध्यक्ष उमेश कासट आदी उपस्थित होते.

यावेळी संगमनेरकरांना शुभेच्छा देताना तांबे म्हणाले की, संगमनेर शहराचा समावेश पुढारलेल्या शहरांमध्ये होतो. ज्या पद्धतीने शहराने भौतिक प्रगती साधली आहे, त्याप्रमाणे शहराने सांस्कृतिक, कला, साहित्य व क्रीडा क्षेत्रातही मैलाचा दगड ओलांडला आहे. गेल्या अनेक शतकांपासून यासर्व क्षेत्रात संगमनेर नेहमीच आघाडीवर राहिले असून सांस्कृतिक क्षेत्रात शहराचे मोठे योगदान आहे. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारा गेल्या दीड दशकांपासून आयोजित होणार्या संगमनेर फेस्टिव्हलने शहराच्या वैभवात मोठी भर घातली आहे. जनमनाचा हा महोत्सव उत्तरोत्तर असाच उंचावत राहील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर सोमवारी सादर झालेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातील मावशीची भूमिका प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांनी हुबेहूब वठवली. नेमकी वेशभूषा, प्रासंगिक नेपथ्य आणि नाटकातील प्रत्येक कलाकाराने वठवलेली भूमिका आणि संवाद यामुळे जवळपास अडीच तास संगमनेरकर रसिक खुर्चीला खिळून बसले होते. मावशीच्या भूमिकेतील भरत जाधव यांनी टांग टिंग टिंगा या गाण्यावर घातलेला पिंगा संगमनेरकरांना भलताच भावला. जयराज नायर, प्रदीप वेंगुर्लेकर, उमेश बने, विनम्र भाबल, प्रशांत विचारे, गौरी फणसे, गौरी जागळेकर, अंजली मायदेव व रुही तारु या सहाय्यक कलाकारांनीही या नाटकातील आपापली भूमिका अगदी चोखपणे वठवताना संगमनेरकरांची वाहवा मिळवली.
