वन्यजीवांची तस्करी करणार्‍या चौघांना चार दिवसांची वनकोठडी! पकडण्यात आलेल्या चौघा आरोपींमध्ये दोघे संगमनेर तालुक्यातील साकुरचे रहिवासी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोनच दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पठारभागात पुण्याच्या वनविभागाने कारवाई करीत दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी करणार्‍या तिघांना अटक केली होती. यावेळी त्यांच्या चौकशीतून जुन्नर तालुक्यातील एकाचे नाव समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली असून या चौघांनाही पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने चार दिवसांच्या वनकोठडीत पाठविले आहे. या घटनेने वनक्षेत्रातून लाकडे, चंदन, सागासह आता दुर्मिळ वन्यजीवांची शिकार व त्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन वन्यजीवांच्या जीवांशी खेळणारी संपूर्ण टोळी उध्वस्त करण्याची मागणी होत आहे.

गेल्या शनिवारी (ता.13) पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या पहिल्या अनुसूचीनुसार अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित असलेल्या खवले जातीच्या मांजराचा व्यवहार होणार असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे यांच्या नेतृत्त्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, सचिन रघतवान व महेश मेरगेवाड या अधिकार्‍यांसह वन कर्मचार्‍यांची दोन स्वतंत्र पथके मिळालेल्या माहितीनुसार ‘भानुदास जाधव’ या व्यक्तिशी संपर्क करुन पाठवली. या दरम्यान पथकाकडून ‘त्या‘ व्यक्तिला व्यवहारासाठी कोठे यायचे असे विचारले गेले असता त्याने घारगाव येथे बोलावले होते.

त्यानुसार वनविभागाच्या पथकाने अत्यंत काटेकोर नियोजन करुन घारगाव गाठले. यावेळी संबंधित व्यक्तिकडे खवले मांजराबाबत विचारणा केली असता सदरचे मांजर साकुर येथे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानुसार पथकातील काहीजण संबंधित व्यक्तिसह साकुर येथे गेले. तेथे त्यांना ‘खवले मांजर’ दाखवण्यात आले. मात्र व्यवहारासाठी ते सर्वजण पुन्हा पुणे-नाशिक महामार्गावर खंदरमाळ शिवारातील आसरा खानावळीजवळ आले. तेथे संबंधित तस्करांनी आपल्या बोलेरो वाहनातून (क्र.एम.एच.14/जी.ए.9727) आणलेला प्राणी खवले मांजरच असल्याची खात्री पटताच आधीच दबा धरुन बसलेल्या वन अधिकार्‍यांनी त्यांच्यावर झडप घातली. मात्र त्यातील दोघांनी तेथून पळ काढला, मात्र डोळासणे महामार्ग पोलीस, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने त्यांना पाठलाग करुन पकडले.

वनविभागाने पकडलेल्या संशयितांना त्यांची ओळख विचारली असता त्यांनी आपली नावे महेंद्र मच्छिंद्र केदार (वय 35), सागर भिमाजी डोकेे (वय 25, दोघेही रा.साकुर, ता.संगमनेर) व अशोक दादा वारे (वय 29,रा.ताहराबाद, ता.राहुरी) असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडे अधिकची चौकशी करता व्यवहारासाठी वापरलेला मोबाईल क्रमांक अनिल धोंडीबा भालेकर (वय 61, रा.विठ्ठलवाडी, ता.जुन्नर) याचा असल्याचे समोर आल्याने जुन्नरमधून त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या चौघांनाही रविवारी (ता.14) शिवाजीनगर (पुणे) न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची वनकोठडी देण्यात आली. वनविभागाकडून या प्रकरणाची प्रामाणिकपणे सखोल चौकशी झाल्यास वनक्षेत्रातून होणार्‍या वन्यजीवांच्या शिकारीसह त्यांच्या अवयांच्या तस्करीत गुंतलेली मोठी टोळी उघड होवू शकते. मात्र या कारवाई दरम्यान घडलेल्या विविध प्रसंगावरुन पुणे वनविभाग या प्रकरणाच्या खोलात जावून तपास करील काय? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.


संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी शिवारात पुण्याच्या वनविभागाने केलेल्या कारवाईत चौघा आरोपींसह अत्यंत दुर्मिळ समजले जाणारे खवले मांजर हस्तगत केले आहे. त्यावरुन पठारभागात वन्यजीवांची तस्करी करणारी टोळी कार्यरत असल्याच्या चर्चांना पाठबळ मिळाले आहे. वनविभागाने हस्तगत केलेले खवले मांजर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या परिशिष्ठातील अनुसूची क्रमांक एकमध्ये समाविष्ट असलेला संरक्षित वन्यजीव आहे.

Visits: 138 Today: 1 Total: 1114003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *