उद्धट बँक कर्मचार्याची निवृत्त शिक्षकाला शिवीगाळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासकीय व सहकारी बँकातील निर्ढावलेल्या यंत्रणेचे विविध किस्से नेहमीच चर्चेत येत असतात. सोमवारीही तालुक्यातील घुलेवाडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेतील कर्मचार्याचा उद्धटपणा समोर आला आहे. यावेळी मात्र अशा प्रवृत्तीच्या कर्मचार्याला शेरास शव्वाशेर मिळाला. निवृत्त शिक्षक असलेल्या ‘त्या’ ग्राहकाने कर्मचार्याचा उद्धटपणा सहन न झाल्याने थेट शहर पोलीस ठाणे गाठीत त्या कर्मचार्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शहर पोलिसांनीही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.4) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घुलेवाडी येथील 73 वर्षीय निवृत्त शिक्षक कारभारी सीताराम देव्हारे हे पैसे काढण्यासाठी कारखान्यावरील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत गेले होते. त्यांचा चेक मंजूर होवूनही शाखेतील रोखापाल त्यांना पैसे न देता वेळ घालवित असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पैसे देण्याबाबत त्यांना विनंती केली. त्यावर त्याने उद्धटपणे उत्तर देत ‘दम नाही का?’ असे म्हटल्यावर संबंधित वयोवृद्ध निवृत्त शिक्षकाने ‘तुम्ही नीट बोला’ असे सांगीतल्याचा त्या महाशयांना राग आला. त्यावर त्याने त्या वयस्कर माणसाला अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यावेळी शाखेचे व्यवस्थापक व अन्य कर्मचारीही तेथे उपस्थित होते व सुरू असलेला सर्व प्रकार मूकदर्शी बनून बघत होते, मात्र त्यापैकी कोणीही त्या उद्धट कर्मचार्याला रोखण्याचा अथवा त्याला समज देण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकाराने अपमानीत झालेल्या त्या शिक्षकाने थेट शहर पोलीस ठाणे गाठून आपली आर्जव मांडली. त्यानुसार शहर पोलिसांनी घुलेवाडी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचा उद्धट कर्मचारी सुभाष बाजीराव शिंगोटे याच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे यांच्याकडे देण्यात आला आहे.