अल्पवयीन मुलासोबत अश्लिल कृत्य करणार्या संगमनेरच्या व्यापार्यास तीन वर्षांचा कारावास! जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; 2018 साली जय भारत चौकातील श्री स्टेशनर्स मध्ये घडला होता प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंधरा वर्षीय मुलासोबत अश्लिल कृत्य करणार्या श्री स्टेशनर्स या दुकानाचा संचालक राजेश दिगंबर पाठक याला संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 2018 मध्ये सदरील घटना घडली होती. याप्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी आरोपी राजेश पाठक याच्या विरोधात पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यावरील सविस्तर सुनावणीनंतर अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी त्याला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. यावृत्ताने संगमनेरच्या व्यापार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत दाखल असलेल्या तक्रारीनुसार कासारवाडी शिवारात राहणारा व त्यावेळी इयत्ता दहावीत शिकणारा पंधरा वर्षीय मुलगा 24 मे 2018 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी राजेश दिगंबर पाठक याच्या पेटीट विद्यालयासमोरील श्री स्टेशनर्स या दुकानात पुस्तकांची चौकशी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्या दुकानात अन्य ग्राहक अथवा कोणीही नव्हते. पीडित मुलाने आरोपीकडे ‘दहावीचे नवनीत आले का?’ अशी विचारणा केली असता आरोपीने त्याना काऊंटरच्या आतल्या बाजूस येण्यास सांगितले. निरागस असलेला मुलाने त्याप्रमाणे कृती केली असता आरोपीने त्याच्याशी लगड करीत तुझे नाव काय?, तुला भविष्यात करायचे काय? असे म्हणत अश्लिल कृत्य करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार सुरु असतांनाच आरोपीने पीडित मुलाला ‘आतमध्ये येण्यास सांगितले’. त्याचा रोख लक्षात घेवून त्या निरागस मुलाच्या मनात शंका आल्याने त्याने आरोपीचा हात झटकून दुकानाबाहेर धूम ठोकली. या प्रकारानंतर घाबरलेल्या त्या मुलाने आपल्या जवळील मोबाईलवरुन आपल्या मित्रांना बोलावून घेतले असता काही वेळातच तिघेजण पेटीट विद्यालयाजवळ आले. त्या तिघांना पीडित तरुणाने घडला प्रकार सांगितला असता त्यांनी आई-वडीलांना हा प्रकार कळवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनाही फोन करुन माहिती दिली असता ते दोघेही श्री स्टेशनर्समध्ये आले.
यावेळी पीडित मुलासह त्याचे आई-वडील व तिघा मित्रांनी घडल्याप्रकाराबाबत आरोपी राजेश पाठक यांच्याकडे विचारणा केली असता त्याने कानावर हात ठेवीत असे काही घडलेच नसल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित मुलाने आपल्या जन्मदात्यांसह थेट शहर पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी केला व आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावणी संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर झाली. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अॅड.मच्छिंद्र गवते यांनी जोरदार युक्तिवाद करीत विविध प्रकरणांचे दाखल सादर केले. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. सरकारी पक्षाचे सादर केलेले सबळ पुरावे व सरकारी वकीलांनी केलेला युक्तिवाद ग्ररह्य धरुन न्यायालयाने आरोपी राजेश दिगंबर पाठक याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. चार वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाल्याने पीडित मुलाच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. या खटल्यात सरकारी वकील गवते यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पोलीस हेडकाँस्टेबल प्रवीण डावरे, चंद्रकांत जोर्वेकर, एकनाथ खाडे, महिला पोलीस सारीका डोंगरे व स्वाती नाईकवाडी यांचे सहकार्य लाभले.