तेरा हजार हेक्टर पोटखराब शेती लागवडी लायक! संगमनेर उपविभाग जिल्ह्यात अव्वल; 3 हजार 169 शेतकर्‍यांच्या सातबारा नोंदी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील लागवडीखाली घेण्यात आलेल्या पोटखराब शेती क्षेत्राची सातबारा उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्या अंतर्गत संगमनेर उपविभागाने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जोरदार काम केले आहे. या मोहीमेत उपविभागातील तब्बल 3 हजार 169 शेतकर्‍यांच्या 13 हजार 404 हेक्टर पोटखराब शेती क्षेत्राची सातबारा उतार्‍यावर लागवडी लायक अशी नोंद घेण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहीमेत संगमनेर उपविभागाने जिल्ह्यात अव्वलस्थान पटकाविल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दिली.


गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून चालू वर्षी फेब्रुवारी दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या दरम्यान संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यात 1 हजार 249 शेतकर्‍यांचे 1 हजार 922.48 हेक्टर पोटखराब क्षेत्र तर अकोले तालुक्यातील 1 हजार 920 शेतकर्‍यांचे 11 हजार 482.03 हेक्टर पोटखराब क्षेत्र अशा एकूण 13 हजार 404.51 पोटखराब क्षेत्राची नोंद सातबारा उतार्‍यांवर लागवडी लायक अशी करण्यात आली आहे. या मोहीमेमुळे उपविभागातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संगमनेर व अकोले तालुक्यातील पोटखराबा (वर्ग अ) क्षेत्र लागवडी लायक आणण्यासाठी 11 जुलैपर्यंत पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी अद्याप पोटखराबा (वर्ग अ) क्षेत्र लागवडी लायक करण्यासाठीची कार्यवाही केलेली नसेल अशा शेतकर्‍यांनी तलाठी अथवा मंडलाधिकार्‍यांशी तत्काळ संपर्क साधावा व पोटखराबा (वर्ग अ) क्षेत्र लागवडी लायक करून घेणेबाबत आवश्यक ती पूर्तता करावी असे आवाहनही डॉ.शशीकांत मंगरूळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *