राज्यातील सत्तासंघर्षात संगमनेरातील जुन्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता! पक्षाने विचारांपासून फारकत घेतल्याचे मत; बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य असल्याचाही मतप्रवाह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यात आता तळातला शिवसैनिकही केंद्रस्थानी येवू लागला आहे. शिवसेनेतीलच तब्बल चाळीस आमदारांनी स्वपक्षाच्या धोरणांविरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्याने राज्यात अभूतपूर्व राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यातच या सर्व बंडखोरांकडून आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठीच हा प्रयोग केल्याचे वारंवार सांगितले जात असल्याने त्याचा परिणाम आता शिवसैनिकांच्या मानसिकतेवरही होवू लागल्याचे दिसू लागले आहे. रविवारी (ता.26) संगमनेरातील काही जुन्या शिवसैनिकांनी ‘थांबा; विचार करा आणि मगच आक्रमक व्हा!’ अशा आशयाच्या मथळ्याखाली गेल्या अडीच वर्षांचा लेखाजोखा असलेला एक संदेश सोशल माध्यमात फिरवला जात आहे. त्यावरुन ग्रामीण भागातही बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
गेल्या सोमवारी (ता.20) राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडली. या निवडणूकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याऐवजी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी अनपेक्षीत लढत होवून त्यात काँग्रेसची पहिल्या पसंदीची मते मिळविणारे चंद्रकांत हंडोरे यांना आपल्या पक्षाच्या भाई जगताप यांच्याकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण प्रक्रीयेत राष्ट्रवादी वगळता शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांची मते फुटल्याचेही समोर आल्याने या निकालांनंतर राज्य सरकारमध्ये बेबनाव निर्माण होईल असा अनेकांचा कयास होता, मात्र तो फोल ठरला आणि राजकीय भूकंप व्हावा अशी अवस्था राज्यात निर्माण झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली आघाडी शिवसेनेसाठी हानीकारक असून गेल्या अडीच वर्षात पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
सत्ता स्थापन करण्याच्या नादात पक्षाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांपासूनच फारकत घेतल्याने जनमाणसांतील भावना तीव्र असल्याचे सांगत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील तब्बल नऊ मंत्र्यांसह 40 आमदारांना घेवून सुरुवातीला सुरत आणि नंतर थेट आसाममधील गोहत्ती (गुवाहाटी) गाठले. गेल्या आठ दिवसांपासून यासर्वांचा तेथेच तळ असून या दरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. उभ्या फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिवसेनेत इतक्या गंभीर घडामोडी घडूनही मुंबई व परिसर वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांबाबत सामान्य शिवसैनिकांमधील रोष मात्र फारसा उफाळलेला दिसून येत नाही. यावरुन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसैनिकांचीही साथ तर मिळत नसेल ना? अशीही शंका निर्माण झाली आहे.
या शंकेला विश्वासाचं कोंदण घालणारा प्रकारही रविवारी (ता.26) समोर आला आहे. संगमनेरसारख्या ग्रामीण शहरातील काही जुन्या शिवसैनिकांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबतची आघाडी आणि त्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांना मिळालेली तिलांजली, मागील अडीच वर्षातील सत्ताकाळात पक्षाचे झालेले नुकसान, जनसामान्यांकडून समोर येणार्या प्रतिक्रीया आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये दिसणारे त्याचे प्रतिबिंब यांचा ऊहापोह करणारा एक भलामोठा संदेश सामाजिक माध्यमातून फिरवला जात आहे. या संदेशाच्या शेवटच्या ओळीत ‘शिवसेनेच्या हितासाठी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांसाठी एकनाथ शिंदे साहेबांना साथ द्या, जय महाराष्ट्र!’ असे आवाहनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा संदेश सोशल माध्यमात ‘व्हायरल’ करण्यात संगमनेरातील काही जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांचाच हातभार असल्याने भविष्यात शिवसेना फुटीचे पडसाद संगमनेरातही दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोशल माध्यमातील या संदेशाची सुरुवात ‘थांबा; विचार करा, मगच आक्रमक व्हा!’ या मथळ्याने करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला कार्यभाग साधला आहे. शिवसेना संपविण्याचा घाट अडीच वर्षांपूर्वीच घातला गेला होता, त्याचे पडसाद आज उमटताहेत. पक्षाने भाजपाच्या सोबतीने निवडणूक जिंकली तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कल महाराष्ट्राच्या जनतेने दिला होता. मात्र धूर्त राजकीय खेळीने पक्षाला भाजपापासून दूर नेले आणि एकमेकांत वैचारिक दुही निर्माण केली. ही खेळी पक्षप्रमुखांच्या लक्षात आली नाही. हिंदुत्त्वात फूट पाडून आपला रस्ता मोकळा करण्याचे काम या अनैसर्गिक आघाडीतून घडले. शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांवर, पक्षांवर नितांत प्रेम करणारा आहे हे धूर्त राजकारण्यांना माहिती असल्याने अनैसर्गिक असली तरीही ही आघाडी फोडण्याचे काम कोणी करणार नाही, तसे झालेच तर सामान्य शिवसैनिक बंडखोरांच्या घरावर हल्ले चढवतील व त्यातून या पक्षात अंतर्गत कलह निर्माण करण्याची खेळी खेळली गेल्याचेही या संदेशात म्हंटले आहे.
योगायोगाने पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या मूळ विचारांना सोबत घेवून पक्षाच्या चाळीस आमदारांसोबत वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांचा हा प्रयत्न प्रामाणिक असून अडीच वर्षांपूर्वी आघाडीची समीकरणं जुळवून शिवसेना संपविण्याचा घातलेला घाट उलथविण्यासाठी त्यांनी बंडखोरी केली आहे. मागील निवडणुकीत संपलेले दोन्ही पक्ष शिवसेनेच्या साथीने सत्तेत येवून शिवसेनेलाच भूईसपाट करण्याचे षडयंत्र करीत आहेत. त्यात या दोन्ही पक्षांचे नेते आघाडीवर आहेत. त्यांना पुरक असलेली भूमिका घेत स्वपक्षातीलच काहीजण सामान्य शिवसैनिकांची माथी भडकावित असून पक्षहित पाहणार्यांना वेठीस धरले जात असल्याचेही या संदेशात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय गेल्या अडीच वर्षातील विविध घटना, प्रसंग व घडामोडीही या विस्तृत संदेशात नमूद करण्यात आल्या असून एकनाथ शिंदे यांची भूमिका पक्षासाठी आवश्यक असल्याचे वारंवार सांगण्यात आले आहे. बंड करणार्या एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या अन्य आमदारांनी आपण कडवे शिवसैनिक असून पक्षप्रमुखांनी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकारात शिंदे अथवा अन्य आमदारांची राजकीय महत्त्वकांक्षा कोठेही दिसून येत नाही, त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न शिवसेना वाचवण्यासाठीच असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्त्वाचा विचार नेटाने पुढे नेणारा आहे. त्यामुळे कोणतीही कृती करण्याआधी एकवेळ या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतरच आक्रमक व्हा, एकनाथ शिंदे यांच्या हाताला बळकटी द्या आणि पुन्हा आपली कडवी शिवसेना उभी करण्यास हातभार लावा असे आवाहनही या संदेशातून करण्यात आले आहे.
राज्यातील सत्ता संघर्षात आत्तापर्यंत केवळ आमदारांचे पलायन आणि त्यानंतर मुंबई आणि परिसरातील काही आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांचे हल्ले घडले आहेत. मात्र शिवसेनेचा मूळ स्वभाव विचारात घेता इतकी मोठी घटना घडल्यानंतरही मुंबई व परिसर वगळता राज्यात अन्य काही ठराविक ठिकाणीच झालेला किरकोळ स्वरुपाचा विरोध लक्षात घेता राज्यातील शिवसैनिकही सध्या संभ्रमात असल्याचे दिसत असून ‘विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती!’ अशीच काहीशी त्यांची अवस्था असल्याचे सोशल माध्यमातील या संदेशातून जाणवत आहे.