होलमराजाच्या काठीयात्रेने संगमनेरात निर्माण केले चैतन्य! भक्त आणि भगवंताची भेट पाहण्यासाठी साळीवाड्यात दाटली भाविकांची गर्दी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिशय प्राचीन परंपरा असलेल्या होलमकाठीच्या शिखरी सोहळ्यानंतरच्या शुभागमनाने संगमनेरात नवचैतन्य निर्माण केले. गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोविडच्या सावटामुळे धार्मिक उत्सवांना मर्यादा होत्या. यंदा मात्र भक्तिपुढे भिती नामोहरम झाल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळी वाजतगाजत मोठ्या डौलाने माळीवाड्यात आगमन झालेली मानाची होलमकाठी भाविकांच्या गर्दीमुळे तब्बल साडेतीन तास जागेवरच होती. तेथून पुढे साळीवाड्याच्या जागृत खंडोबा मंदिरात झालेल्या ‘भक्त आणि भगवंता’च्या दिव्य सोहळ्यासाठीही यंदा भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

संगमनेर शहरातील तेलीखुंटावर होलमराजाचा वाडा असल्याचे मानले जाते. या वाड्यात राहणार्या आपल्या भक्ताला भेटण्यासाठी खुद्द मल्हारी मार्तंड खंडोबाराय साक्षात आल्याचे भाविक मानतात. दरवर्षी आपली भेट व्हावी, आपल्या दर्शनाने जीवनात सुगंधीत व्हावे ही होलमराजाची विनवणी मान्य करतांना देवाने माघी पोर्णिमा उत्सवात होलमराजाच्या काठी झेंड्याला मोठा मान दिला. या झेंड्यासोबत चालणार्या होलमराजाच्या घोड्यालाही जेजुरीत तितकाच मान आहे. होलमराजा हयात असेपर्यंत दरवर्षी ते वाजतगाजत हा मानाचा झेंडा आणि घोडा घेवून जेजुरीला जात आणि आपल्या आराध्यदैवताचे मनोभावे पूजन करीत.

त्यांच्यानंतरही ही परंपरा कायम राहिली. आजही होलम-काटकर समाजातील भाविक हा दिव्य सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोविडचे संक्रमण असल्याने या सर्वच उत्सवांना मोठ्या मर्यादा आल्या होत्या. मात्र यावर्षी राज्य सरकारने निर्बंधात काही प्रमाणात सूट दिल्याने राज्यातील यात्रा-जत्रा व धार्मिक सोहळ्यांची सर्वत्र धूम असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यात महाराष्ट्राच्या कुलदैवताच्या वार्षिक माघी उत्सवाचाही समावेश आहे. गेल्या बुधवारी वाजतगाजत जेजुरीत पोहोचलेली होलमकाठी देवाच्या मस्तकी खोबरे-भंडार्याची उधळण करीत शिखरी लागली आणि बुधवारी (ता.23) पुन्हा परतीच्या प्रवासात संगमनेरी पोहोचली.

दुपारी तांदूळबाजारातील खंडोबारायाची भेट घेवून होलमराजाच्या काठीने सायंकाळी माळीवाड्यातील मारुती मंदिराजवळ विश्राम केला. एव्हाना दीड-दोन तास येथे थांबणार्या होलमकाठीला यावेळी मात्र भाविकांच्या तौबा गर्दीमुळे तब्बल साडेतीन तासांचा विश्राम घ्यावा लागला. काठीच्या आगमनाप्रित्यर्थ माळीवाडा परिसरात मोठी यात्रा भरली होती. हातात पेटत्या दिवट्या घेवून येळकोटऽ.. येळकोटऽऽ.. जय मल्हारचा घोष करीत व रेवड्या-गोडीशेवची उधळण करीत शेकडों भाविकांचे जथ्थे माळीवाड्याच्या दिशेने येत होते. या परिसरात छोट्या-मोठ्या खेळणीच्या, खाद्य पदार्थांच्या दुकानांची दाटी झाली होती. मोठ्या कालावधीनंतर संगमनेरात अशाप्रकारचा धार्मिक उत्सव साजरा होत असल्याने अबालवृद्ध होलमराजाच्या काठीला स्पर्श करण्यासाठी माळीवाड्यात येत होते. कोविडच्या सावटात साजर्या झालेल्या या सोहळ्यातून भाविकांच्या चेहर्यावर ओसंडणारा उत्साह भयापेक्षा भक्ती मोठी असल्याचे दर्शवित होता. तब्बल साडेतीन तासांच्या विश्रातीनंतर रात्री सव्वादहाच्या सुमारास काठीने माळीवाडा सोडून साळीवाड्याकडे प्रस्थान केले व सोडतदहाच्या सुमारास येथील खंडोबा मंदिरात काठीचे जल्लोशपूर्ण वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी देवाची महाआरती झाली.

दरवर्षी शिखरी लागून परतलेल्या होलमकाठीच्या पटक्याचा गोंडा साळीवाड्यातील देव प्रकटलेल्या पुरातन आडात सोडून तो बुडविला जातो. हा सोहळा म्हणजे ‘भक्त आणि भगवंता’ची भेट असल्याचे भाविक मानतात. त्यामुळे येथील खंडोबा मंदिराच्या परिसरात हा दिव्य सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अकराच्या सुमारास हा सोहळा पार पडल्यानंतर काही वेळ काठीचा विश्राम झाला आणि तद्नंतर मानाच्या या होलमकाठीचे वाजतगाजत आपल्या मुक्कामस्थळी प्रस्थान झाले. यावेळी बोला सदानंदाचाऽ.. येळकोटऽऽ.. असा एकच घोष करण्यात आला. साळीवाड्यात दर्शनासाठी येणार्या भाविकांना पुरुषोत्तम बिसनलाल जोशी (महाराज) यांच्याकडून बुंदी-भाताचा प्रसादही वाटण्यात आला.

