मुळा पाणीप्रश्नी मंगळवारपासून किसान सभेचा सत्याग्रह सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून बुधवारी निघणार विराट मोर्चा

नायक वृत्तसेवा, अकोले
मुळा खोर्यातील पाण्याचे समन्यायी पुनर्वाटप करून अकोले विधानसभा मतदारसंघातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला शेती व पिण्यासाठी पाण्याचा रास्त वाटा द्या, हिरड्यांची सरकारी खरेदी सुरू करा, कोतूळ आंदोलनात मान्य केलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा, तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडा, शेती व वस्तीसाठी वीज द्या. या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्यावतीने मंगळवारपासून (ता.14) कोतूळ (ता.अकोले) येथील मुख्य चौकात सत्याग्रह सुरू करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याबाबत कोतूळ खोर्यात संघर्ष सुरू आहे. आंदोलक आपल्या परिसरातील जनतेची बाजू घेऊन संघर्ष करत आहेत. पिंपळगाव खांड धरणात साठलेले ओंजळभर पाणी वाटण्यावरून परिसरात तणाव आहे. मुळा धरणाच्यावर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यापर्यंत पाण्याचा साठा अत्यल्प आहे. मुळा खोर्यातील सर्व पाणी मुळा धरणात प्रामुख्याने साठविण्यात येऊन मुळा धरणाच्या खाली शेतीला व शहरांना हे पाणी पुरवले जात आहे. खोर्यातील बहुतांश पाणी मुळा धरणात साठविल्यामुळे मुळा धरणाच्या वरील भागातील अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत.
![]()
प्रवरा खोर्यात पाणी पुनर्वाटपाची ऐतिहासिक लढाई झाली व त्यामुळे अकोले तालुक्यात प्रवरेच्या पाण्याचे पुनर्वाटप करून पाण्याचा हक्क मिळाला. निळवंडे धरणाच्या बाबतही निळवंडेत अकोल्याचा वाटा किती यावरून संघर्ष झाला व उच्चस्तरीय कालव्यांची निर्मिती करुन अकोले तालुक्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी यशस्वी लढा देण्यात आला. मुळा खोर्यात मात्र अशी मूलभूत लढाई अद्याप झालेली नाही. पिंपळगाव खांड धरणात साठलेल्या अत्यल्प पाण्यात वाटा मागण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाला व्यापक करण्याची आवश्यकता आहे. मुळा धरण बांधले म्हणजे धरणाच्या वरील भागातील आदिवासी व बिगर आदिवासी सर्व शेतकर्यांना पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित ठेवण्याचा कायदा झाला असे होत नाही. राज्यात समन्यायी पाणी वाटपाचे धोरण असल्यामुळे अन्यायकारक पद्धतीने मुळा खोर्याचे झालेले पाणी वाटप दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मुळा धरणाच्यावर हरिश्चंद्रगडापर्यंत ठिकठिकाणी पाणी साठवण्याच्या साईट्स उपलब्ध आहेत. मात्र केवळ पाणी उपलब्ध नाही हे कारण सांगून येथील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून कोतूळ येथे सुरू होणार्या किसान सभेच्या आंदोलनात या मूलभूत मुद्द्याला केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभा आग्रही असणार आहे.

पाणीप्रश्ना बरोबरच आदिवासी भागात सरकारी हिरडा खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, तोलारखिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडावे, निराधारांना 21 हजारांच्या आत उत्पन्न दाखले द्यावेत, पिंपळगाव खांड, फोपसंडी व कोतूळ परिसरातील वाड्या-वस्त्यांचे बंद पाडण्यात आलेले रस्ते तातडीने खुले करून त्यांचे मजबुतीकरण व दुरुस्तीकरण करावे यासारख्या मागण्यांबाबतही या आंदोलनात आवाज उठविण्यात येणार आहे. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी किसान सभेच्यावतीने कोतूळ येथे मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे किसान सभेच्यावतीने डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजू गंभीरे, भीमा मुठे, प्रकाश साबळे, साहेबराव घोडे, शांताराम वारे, किसन मधे, निवृत्ती डोखे, देवराम डोखे, सुरेश गिर्हे यांनी सांगितले आहे.
