कोपरगावातील दोन्हीही कारखान्यांनी कोविड सेंटर उभारावे; मनसेची मागणी

कोपरगावातील दोन्हीही कारखान्यांनी कोविड सेंटर उभारावे; मनसेची मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील काळे कारखाना, संजीवनी उद्योग समूह, गोदावरी दूध संघ, समता पतसंस्था, राजाभाऊ झावरे रिक्षा पतसंस्था व नगराध्यक्ष विजय वहाडणे आदिंनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत केलेली आहे. परंतु आता वाढत चाललेल्या प्रादुर्भावाच्या दृष्टीकोनातून तालुक्यातील दोन्हीही कारखान्याने स्वतंत्रपणे 300 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.


कोपरगाव शहरासह तालुक्यावर आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी कायमच काळे, कोल्हे, परजणे यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे. आत्ताही आलेले संकट परतवून लावण्यासाठी काळे व कोल्हे या दोन्ही साखर काखान्यांनी स्वतंत्रपणे लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांसाठी 300 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारावे. तसेच येथे नियमित पाणी, चहा, नाश्ता आणि जेवणाची मोफत सोय करावी. शिवाय शहरात गंभीर प्रसंगी 50 खाटांचे कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र (व्हेन्टिलेटर) सुविधांसह अतिदक्षता रुग्णालय एखादे प्रशस्त सभागृह पाहून तातडीने सुरु करावे. तसेच तालुक्यात बोटावर मोजण्या इतपतच फिजिशियन डॉक्टर आहेत. त्यामुळे न्यूमोनियासह इतर आजारांच्या रुग्णांची फरफट सुरु आहे. याकरिता स्वतंत्र रुग्णालय उभारावे. यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मुकाबला करत असलेल्या शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मनसेचे उप-जिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रोहित एरंडे, संजय चव्हाण, शंकर होडे, राजू शेख आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *