पाटामध्ये ट्रॅक्टर उलटून एक तरुण ठार कारेगाव ते रांजणगावदेवी रस्त्यावरील दुर्घटना

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील कारेगाव ते रांजणगावदेवी जाणार्या पाटाच्या रस्त्यावर ट्रॅक्टर पाटामध्ये उलटला. या अपघातात नितीन हरिभाऊ माळी (वय 22) याचा मृत्यू झाला तर चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक सुशांत अनिल वाळुंजकर याच्याविरुध्द नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()
हरिभाऊ सावळेराम माळी (वय 55, रा.माळीचिंचोरा, ता.नेवासा) यांनी दिलेल्या खबरीत म्हटले की, शुक्रवारी (ता.10) माळीचिंचोरा शिवारातील माझ्या शेतातील कामासाठी हनुमंत सुधाकर (वाळुंजकर रा. कारेगाव ता. नेवासा) याच्या मालकीचा ट्रॅक्टर बोलवला होता. त्यावेळी ट्रॅक्टरवर चालक म्हणून सुशांत वाळुंजकर हा होता. तो स्वतः ट्रॅक्टर चालवत असताना त्याने परत जाताना माझा मुलगा नितीन यास ट्रॅक्टरवर चालकाच्या बाजूस असलेल्या सीटवर बसविले. थोड्या वेळाने साईनाथ अहिरे याने फोन करून सांगितले की कारेगाव ते रांजणगाव जाणार्या पाटामध्ये ट्रॅक्टर उलटला आहे व ट्रॅक्टरखाली तुमचा मुलगा व एक इसम जखमी झाला आहे.

त्यावेळी माझा मुलगा गंभीर अवस्थेत जखमी होता. तसेच ट्रॅक्टरवरील चालक सुशांत वाळुंजकर हा देखील गंभीर जखमी होता. वाहनातून जखमी मुलास व ट्रॅक्टर चालकास वडाळा मिशन हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी चालक सुशांत वाळुंजकर यास उपचारासाठी दाखल करुन घेतले व माझ्या मुलास गंभीर मार लागल्यामुळे त्यास पुढील उपचारांकामी दुसर्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितले असता माझ्या मुलास नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तो उपचारांपूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. यावरुन पोलिसांनी चालक सुशांत अनिल वाळुंजकर याच्याविरुध्द गु. र. नं. 480/2002 भादंवि कलम 304(अ), 328, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
