दुचाकीची डिक्की, प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणारी टोळी पकडली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची औरंगाबादमध्ये दमदार कामगिरी


नायक वृत्तसेवा, नेवासा
अगदी छोट्या, मात्र धारदार हत्याराने दुचाकीची डिक्की, प्रवाशांच्या बॅगा फाडून चोरी करणारी आरोपींची टोळी अहमदनगर पोलिसांनी उघडकीस आणली. त्यातील मूळचा आंध्रप्रदेशातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादपर्यंत आरोपींचा पाठलाग केला. औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने तेथील एका टोलनाक्यावर नाकेबंदी करून एका आरोपीला पकडले. त्याचा साथीदार मात्र पळून गेला. अहमदनगर शहरातील एका हॉस्पिटल समोरून दुचाकीची डिक्की फोडून आरोपींनी 3 लाख 30 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती.

रमेश रामू कोळी (वय 32, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश ह. रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून 3 लाख 15 हजार रुपये हस्तगत केले आहेत. 29 एप्रिल रोजी त्यांनी तारकपूर येथील एका हॉस्पिटलसमोरून ही चोरी केली होती. सागर अनिल पवार (रा. नेप्ती, ता. नगर) यांचे मित्र सुनील कांडेकर यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी लागणारे पैसे 3 लाख 30 हजार रूपये शहरातील एका बँकेतून त्यांनी काढले. ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. दुचाकीसह ते रुग्णालयात आले. दुचाकी पार्किंकमध्ये उभी करून ते पैसे तेथेच ठेवून ते मित्राला भेटायला गेले.

ते परत आले तेव्हा डिक्की उघडल्याचे आणि पैसे चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ दिवटे, सोपान गोरे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, जालिंदर माने, योगेश सातपुते यांच्या पथकाने तपास सुरू केला. हे पथक नेवासा परिसरात आरोपीची माहिती व शोध घेत असताना संशयित दोघे जण दुचाकीवरून औरंगाबादकडे जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन पोलिसांशी संर्पक साधून चितेगाव टोलनाका येथे नाकाबंदी लावण्यात आली. थोडाच वेळात आरोपी तेथे आले. मात्र, पोलिसांना पाहून दुचाकीवर मागे बसलेला उडी टाकून पळून गेला. दुसर्‍याला बॅगेसह पकडण्यात आले.

Visits: 14 Today: 1 Total: 115017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *