किरकोळ कारणावरुन तरुणाचा निर्घुण खून! हनुमान जयंतीच्या संध्येला संगमनेर खुर्द मध्ये घडला प्रकार; आरोपी ताब्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील विविध कारणाने राजकीय स्वरूप प्राप्त झालेल्या आणि देशभरात अतिशय उत्साहाने आणि भक्तीभावाने साजऱ्या झालेल्या हनुमान जयंतीच्या उत्सवाला सायंकाळ होता होता दुःखाची किनार लागली. किरकोळ कारणावरुन दोन तरुणांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकाचा खून होण्यात झाले. सदरचा प्रकार संगमनेर खुर्द मध्ये घडला असून या घटनेत प्रकाश दुर्योधन गोफने या 32 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणातील अठरा वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार हनुमान जयंतीच्या दिनी सायंकाळी साडेपाच ते आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान संगमनेर खुर्दच्या सुपेकर वस्ती परिसरात घडला. यातील आरोपी सुरज सोमनाथ जेडगुले (वय 18, रा.संगमनेर खुर्द) हा दारु पिऊन आल्याने त्याचे व मयत प्रकाश दुर्योधन गोफणे या दोघांची जोरदार भांडणे झाली. यावेळी गोफने याने लाकडी दांड्याने जेडगुले याच्या तोंडावर मारल्याने त्याच्या मनात गोफने विषयी राग निर्माण झाला. यामुळे त्याने त्यानंतरच्या कालावधीत कोणत्यातरी हत्याराने प्रकाश दुर्योधन गोफने याचा निर्घुण खून केला.
सदरची घटना समोर आल्यानंतर निपचीत होऊन पडलेल्या जखमी प्रकाश गोफने याला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत त्याचा भाऊ शंकर गोफने याने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुरज सोमनाथ जेडगुले याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची या प्रकरणात कसून चौकशी सुरू असून अद्याप त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. या घटनेने संगमनेर खुर्द शिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत असून किरकोळ कारणावरून एका तरुणाला जीव गमवावा लागला तर, दुसऱ्या तरुणाला त्या प्रकरणात कारागृहात जावे लागले आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख स्वतः करीत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Visits: 23 Today: 1 Total: 117810