शिर्डीत साई मंदिराबाहेर भाजपचे शंखनाद आंदोलन ‘बाळासाहेब परत या उद्धव ठाकरेंना अक्कल द्या’ घोषणांनी दणाणला परिसर
नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने शिर्डी येथील मंदिराबाहेर शंखनाद आंदोलन करण्यात आले. शंखनादासोबतच कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. ‘बाळासाहेब परत या उद्धव ठाकरेंना अक्कल द्या’, ‘दार उघड दार उघड उद्धवा मंदिराचे दार उघड,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
श्रीकृष्ण जयंती व चौथा श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर सोमवारी (ता.30) भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे जिल्हाभर शंखनाद आंदोलन करण्यात आले. शिर्डी येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली तर कोल्हार भगवतीपूर येथे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शंखनाद करतानाच कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्धही संताप व्यक्त केला. ‘दार उघड दार उघड उद्धवा मंदिराचे दार उघड’ यासोबतच ‘बाळासाहेब परत या उध्दव ठाकरेंना अक्कल द्या,’ ‘सर्व मंदिरे खुली झालीच पाहिजेत’, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष गोंदकर म्हणाले, पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. आता सर्वत्र व्यवहार सुरळीत असतानाही अद्यापही मंदिरे बंदच आहे. मंदिरांवर अवलंबून असणार्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत असून त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही. वीजबिले भरण्यासाठीही लोकांकडे पैसे नाहीत.
जिल्हाध्यक्ष गोंदकर म्हणाले, देशातल्या अन्य राज्यांत मात्र मंदिरे सुरू आहेत. आपल्या राज्यातच जाणीपूर्वक ठाकरे सरकार मंदिरे उघडण्यास परवानगी देत नाही. पूर्वीही मंदिरे बंद होती, तेव्हा भाजपला आंदोलन करावे लागले होते. त्यानंतर मंदिरे उघडण्यात आली होती. त्यामुळे आताही मंदिरे उघडण्यास भाग पाडल्याशिवाय भाजप राहणार नाही. यावरही निर्णय घेतला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा त्यांनी दिला. अहमदनगरच्या मंदिर बचाव समितीने दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची याच विषयावर भेट घेतली होती. त्यावेळी मंदिरे उघडली जावीत अशी आपलीही भूमिका असल्याचे सांगून या मागणीसाठी आंदोलन केल्यास सहभागी होऊ असे हजारे यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, या आंदोलनात हजारे यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही.