संगमनेरच्या ग्रामदैवताचा मंगळवारी यात्रौत्सव! रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा; बुधवारी कुस्त्यांचा हगामा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या श्री लक्ष्मणबाबा यांचा उद्या (ता.3) यात्रौत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने यात्रा समितीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लक्ष्मणबाबांच्या शेंदरी मूर्तीला अक्षय्यतृतीयेच्या दिनी लघुरुद्राभिषेक घालून या उत्सवाला सुरुवात होईल. दुपारी छबीना मिरवणूक व सायंकाळी कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर भाविकासांठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.

श्री लक्षमणबाबांचा इतिहास खूप वेगळा आणि परोपकारी आहे. सर्वसामान्य माणसांच्या अडअडचणींना मदत करणारा अवलिया म्हणून त्यांची जनमाणसांत प्रतिमा होती. हातात धनुष्यबाण असलेल्या त्यांच्या प्रतिमेवरुन त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांचे बंधू लक्षमणही समजले जाते. मात्र ती केवळ एक धारणा असून खुद्द लक्षमणबाबाही साधारण कुटुंबातीलच दैवीशक्ती प्राप्त असलेले मानव होते. संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात पूर्वी असलेल्या बारवेच्या काठावरच त्यांचे छोटेखानी मंदिर होते. नंतरच्या काळात भाविकांच्या मदतीने त्याचा जिर्णोद्धार करण्यात आला आणि आजच्या स्थितीतले मोठे मंदिर तेथे उभे राहिले.

दरवर्षी अक्षय्यतृतीयेच्या दिनी लक्ष्मणबाबांचा उत्सव आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने संगमनेर पंचक्रोशीतील हजारो भाविक पालिकेच्या पटांगणात मोठी गर्दी करतात. सायंकाळच्या सुमारास महात्मा फुले चौक ते लालबहादूर शास्त्री चौकाच्या परिसरात यात्राही भरते. यात्रा समितीच्यावतीने यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी मंगळवारी (ता.3) हा उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पहाटे श्रींच्या शेंदरी मूर्तीला लघुरुद्राभिषेक घातला जाणार आहे.

मंगळवारी दुपारी साडेचार वाजता बाबांच्या प्रतिमेची छबीना मिरवणूक काढली जाणार असून सायंकाळी सात वाजता शास्त्री चौकात फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाचेही आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.4) दुपारी चार वाजता पालिकेच्या प्रांगणात कुस्त्यांचा हगामा होणार असून यात सहभागी होवून बाजी मारणार्‍या पहिलवानांना जोड पाहून एक रुपयापासून दोन हजार रुपयांपर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. तसेच सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. वरील सर्व कार्यक्रमांना संगमनेरकरांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 41 Today: 1 Total: 115609

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *