डोळ्याचे पारणे फेडणारा पुरस्कार वितरण सोहळा ः लाहोटी जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे 12 मान्यवरांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेद्वारा आयोजित व नगर तालुका सभेच्या आदरातिथ्यात संपन्न झालेला पुरस्कार वितरण सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता अशा शब्दांत पुरस्कार वितरण सोहळ्याचा गौरव माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ मार्गदर्शक सत्यनारायण लाहोटी (बीड) यांनी केला.
अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देण्यात येणारे महेश रत्न, महेश भूषण व महेश गौरव या पुरस्कारांचा वितरण सोहळा शेठ रामनाथजी धूत सभागृह (माऊली संकुल, सावेडी) येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षपद विद्यमान प्रदेशाध्यक्ष श्रीकिसन भन्साळी यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष मोहनलाल मानधना, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिष मणियार, जिल्हा सचिव अजय जाजू, महिला जिल्हाध्यक्षा वासंती भट्टड, युवा जिल्हाध्यक्ष सागर राठी, नगर तालुकाध्यक्ष विनोद मालपाणी, सचिव मुकुंद धूत हे उपस्थित होते.
यावेळी लाहोटी यांनी अनेक विषयांना स्पर्श करणारे भाष्य केले. ते उपस्थितांना विशेष भावले. ते म्हणाले कि, प्रत्येकाने आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर धर्म व समाज यासोबत काम करावे असे त्यांनी सूचविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष श्रीकिसन भन्साळी यांनी अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिष मणियार व सचिव अजय जाजू यांच्या चिकाटीने काम करण्याच्या पद्धतीचे विशेष कौतुक केले. तसेच आजच्या सत्कारमूर्तींनी सत्कारासाठी काम केलेले नाही तर त्यांच्या समाधानासाठी काम केले व जिल्हा सभेने त्यांच्या कार्याची दखल घेतली हे उल्लेखनीय आहे.
याप्रसंगी महेश रत्न स्व. डॉ. राजेंद्र मालपाणी (संगमनेर), स्व. नंदकिशोर सारडा (शेवगाव), स्व. निर्मला मालपाणी (राहुरी), महेश भूषण रामसुख (आर. डी.) मंत्री (अहमदनगर), महेश गौरव डॉ. सुभाष मुंदडा कोपरगाव (वैद्यकीय), भरत झंवर अहमदनगर (क्रीडा), अतुल डागा अहमदनगर (सामाजिक), शकुंतला सारडा संगमनेर (कला), कल्याण कासट संगमनेर (उद्योग), श्रीनिवास सोमाणी संगमनेर (कृषी), प्रा. डॉ. विजयकुमार राठी लोणी (शैक्षणिक) तर विशेष सन्मान पुरस्कार रामनाथ व दीपाली बंग (पाथर्डी) यांना सन्मानित करण्यात आले. स्वागताध्यक्ष मोहनलाल मानधना यांनी नियोजन केले. समारंभाचे मुख्य प्रायोजक श्रीगोपाल धूत, प्रवीण बजाज, जितेंद्र बिहाणी (बंगडीवाला) हे होते. तर स्वागत समिती सदस्यांमध्ये श्यामसुंदर सारडा, राजरतन झंवर, काशिनाथ बजाज, अरूण झंवर, बलदेव झंवर (भिंगारवाला), नंदलाल मणियार, द्वारकादास बुब, अॅड. अशोक बंग, राजेंद्र मालू, डॉ. आर. आर. धूत यांचा समावेश होता. प्रास्तविक नगर तालुका मंत्री मुकुंद धूत यांनी केले. परीक्षकांच्यावतीने पत्रकार अविनाश मंत्री यांनी त्रिसदस्यीय निवड समितीची निवड पद्धती स्पष्ट केली. जिल्हाध्यक्ष अनिष मणियार यांनी जिल्हा सभेअंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला. तर जिल्हा सचिव अजय जाजू यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोहळ्यास जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.