शारदा पतसंस्थेला चार कोटी पस्तीस लाखांचा विक्रमी नफा! गिरीश मालपाणी; ग्राहकाभिमुख सेवेद्वारा ठेवींचा आकडाही दीडशे कोटींच्या पार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या संगमनेरच्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 4 कोटी 35 लाख रुपयांचा विक्रमी नफा मिळविला आहे. उच्च दर्जाची सेवा आणि पारदर्शी व्यवहार या संस्थांपकांच्या सूत्राचे संचालक मंडळाने काटेकोर पालन केल्याने गेल्या वर्षात विक्रमी नफ्यासह संस्थेने अनुत्पादीत मालमत्तेचा (एनपीए) दर शून्य टक्के ठेवून संस्थेतील ठेवींचा आकडा 151 कोटीच्या पुढे नेण्यातही यश मिळविल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक गिरीश मालपाणी यांनी दिली.
मागील दोन वर्षांपासून संपूर्ण विश्व कोविड संक्रमणाने हैराण झाल्याने त्याचा परिणाम बाजारपेठांवर पडला. त्यामुळे देशभरात मंदिचे वातावरण तयार झाल्याने व्यापारीवर्ग हवालदिल झाला होता. अशा स्थितीत शारदा नागरी पतसंस्थेने संगमनेरच्या व्यापारी वर्गाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहताना 31 मार्चअखेर 109 कोटी 47 लाखांचे कर्ज वाटप करुन व्यापारी व ग्राहकवर्गाला आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले. संस्थेने गेल्या वर्षभरात 260 कोटी 98 लाख रुपयांचा व्यवसाय केला. सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादीत करतांना संस्थेला आर्थिक सुबत्ता प्राप्त करुन देताना संचालक मंडळाने 76 कोटी 59 लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूकही केली आहे.
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण होवूनही संस्थेच्या संस्थापकांनी घालून दिलेल्या आर्थिक शिस्तीचे सर्वच संचालकांनी अगदी काटेकोरपणे पालन केल्याने गेल्या वर्षातही संस्थेच्या अनुत्पादीत मालमत्तेचा (एनपीए) दर शून्य टक्के राहीला. या कालावधीत संस्थेच्या ठेवींचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढला असून 31 मार्चअखेर संस्थेत 151 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. आर्थिक प्रगती साधतांना संस्थेने आपले सामाजिक दायित्त्वही पूर्ण केले आहे. महिला सभासदांसाठी आयोजित झालेला मेळावा आणि नुकताच पार पडलेला शारदोत्सव सभासदांसाठी अनोखी भेट ठरला.
ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून दिलेली तत्परसेवा, पारदर्शी व्यवहार आणि गिरीश मालपाणी यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन या जोरावर संस्थेने प्रगतीची गरुड झेप घेतल्याची प्रतिक्रीया संस्थेचे चेअरमन डॉ.योगेश भुतडा व व्हा.चेअरमन अमर झंवर यांनी यावेळी दिली. सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा संस्थेवरील अतुट विश्वास यापुढे कायम ठेवण्यासाठी पारदर्शी काम करण्याचे अभिवचन यावेळी संचालक मंडळाचे सदस्य सर्वश्री गिरीश मालपाणी, कैलास आसावा, संकेत कलंत्री, सुमीत अट्टल, राजेश लाहोटी, रोहित मणियार, राजेश रा.मालपाणी, कैलास राठी, विशाल पडताणी, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतीका बाहेती, जगदीश टोकसे, सोमनाथ कानकाटे, लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे यांच्यासह व्यवस्थापक माधव भोर, सहाय्यक व्यवस्थापक विलास सांगळे, शाखा व्यवस्थापक श्रीराम साळुंखे, वसुली अधिकारी संतोष गोयल यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाने दिले आहे. संस्थेने मिळविलेल्या विक्रमी नफ्याबद्दल सभासदांमधून संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.