गावोगाव किसान सभेच्या गाव अधिवेशनांना सुरुवात डोंगरगाव येथे पहिले गाव अधिवेशन उत्साहात पार पडले
नायक वृत्तसेवा, अकोले
अखिल भारतीय किसान सभेच्या गावोगाव शाखा स्थापन करून शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी लढावू एकजूट उभारण्याच्या उद्देशाने अकोले तालुक्यात गाव अधिवेशनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात डोंगरगाव येथे किसान सभेचे पहिले गाव अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.
कामगारांचे व शेतकर्यांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनात डोंगरगाव किसान सभेसाठी 11 जनांची यूनिट कमिटी निवडण्यात आली. अध्यक्षपदी माधव गिर्हे, उपाध्यक्षपदी देवराम आगिवले, सचिवपदी दिलीप हिंदोळे, सहसचिवपदी बाळू चिकणे यांची निवड करण्यात आली. जिल्हा समितीच्यावतीने नामदेव भांगरे, अॅड. ज्ञानेश्वर काकड, प्रकाश साबळे, राजाराम गंभीरे व डी. वाय. एफ. आय. चे साथी एकनाथ मेंगाळ आदी उपस्थित होते.
किसान सभेच्यावतीने अकोले, संगमनेर, राहुरी व पारनेर तालुक्यांमध्ये गावोगाव गाव अधिवेशनाचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. अकोले तालुक्यात 64 गावांची निवड करून किसान सभेची गाव अधिवेशने घेत गाव समित्या स्थापन करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांना देश पातळीवर वाचा फोडणार्या किसान सभेच्या गावोगाव शाखा सुरू करून शेतकर्यांचे स्थानिक प्रश्न धसास लावण्यासाठी या अधिवेशनाचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.