अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संगमनेरच्या गोपाळ उपाध्येंना पौराहित्याचे निमंत्रण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीरामलल्ला अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात विराजमान होत आहेत. जगभरातील रामभक्तांची उत्कंठा वाढवणार्या या सोहळ्याच्या विधींना आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील सात दिवस हे विधी चालणार असून २२ जानेवारी रोजी प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होईल. या सोहळ्यासाठी देशभरातील १२१ ब्रह्मवृंदांची निवड करण्यात आली असून त्यात श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे शिष्य, वेदमूर्ती गोपाळ उपाध्ये यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. वेदमूर्ती उपाध्ये अयोध्येत दाखल झाले असून आजपासून सुरु झालेल्या पौराहित्य कार्यातही सहभागी झाले आहेत.
अयोध्येतील श्रीरामलल्ला मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधींना आजपासून सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी देशभरातील साधू-संत, मान्यवर, राजकीय पक्षांचे प्रमुख विशेष निमंत्रित आहेत. महाराष्ट्रातील ३५५ साधू-संतांसह ८८९ जणांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले असून त्यातील ५३४ जण विशेष निमंत्रित आहेत. तसेच, १६ ते २२ जानेवारी या कालावधीत अयोध्येत चालणार्या विविध विधीकार्यासाठी देशभरातून १२१ ब्रह्मवृंदानाही निमंत्रित करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे, दिनेश गायधनी (नाशिक), विक्रमशास्त्री जोशी (त्र्यंबक), गोपाळ उपाध्ये (संगमनेर) यांच्यासह वसंतराव जोशी, वसंत फडके, सागर दवे, गोपाळ जोशी, देशिक कस्तुरे, कृष्णा पळसकर, प्रशांत जोशी, शशांक कुलकर्णी, निखील भालेराव, विजय भालेराव, केशव आयाचित, गजानन अवचट, अनंत मुळे, संदीप कापसे, महेश नंदे, सुजीत देशमुख, भूषण जोशी, अमोल पाध्ये, नारायण सुलाखे, प्रसाद लाडसांगवीकर, गोरक्षनाथ पैठणकर, दुर्गादास अबुलगेकर व चंद्रशेखर भोगे यांचा समावेश आहे.
संगमनेरचे गोपाळ उपाध्ये अतिशय तरुण असून त्यांनी आळंदीतील स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या गुरुकुलातून वेदशास्त्रांचे अध्ययन केले आहे. अतिशय साधारण कुटुंबातील या तरुणाने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर इथवरचा प्रवास केला आहे. यापूर्वी संगमनेरात त्यांच्या मुखातून श्रीमद् भागवतकथा ज्ञानयज्ञाचेही आयोजन झाले होते. आता त्यांची निवड देशभरातील मोजया वेदमूर्तींमध्ये झाल्याने संगमनेरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.