चक्क वकिलालाच लावला पंचवीस हजारांचा चुना! संगमनेरातील घटना; फसवणुकीचा गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वसामान्य नागरिक, व्यापारी यांची व्यवहारातून फसवणूक होण्याचे प्रकार आपल्याकडे नेहमीचे आहेत, मात्र संगमनेरात फसवणूकीचा वेगळाच प्रकार समोर आला असून चक्क कायद्याचे अभ्यासक समजल्या जाणार्या शहरातील एका नामांकित वकिलालाच त्यांच्या अशिलाने 25 हजारांचा चुना लावला आहे. याबाबत अॅड. अमृतलाल गांधी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आश्वीतील राजेंद्र प्रभाकर कुलथे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने शहराच्या विधी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार 28 सप्टेंबरपासून आजअखेर सुरु होता. या प्रकरणात आश्वीच्या राजेंद्र प्रभाकर कुलथे यांचा नुकसान भरपाईचा दावा संगमनेरच्या न्यायालयात सुरु होता. त्यासाठी त्यांनी संगमनेरच्या अमृतलाल गांधी या वकीलांना आपल्या दाव्याचे वकीलपत्र दिले होते. नुकसान भरपाईच्या दाव्याच्या बाबत असलेल्या अलिखीत प्रघातानुसार संबंधितास नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर त्याने ठरल्यानुसार वकीलाची फी देण्याची पद्धत आहे. त्यामुळे अॅड. गांधी यांनी याच प्रघातानुसार सदरचा दावा स्वीकारुन कुलथे यांच्याकडून न्यायालयात युक्तीवाद केला.

अॅड. गांधी यांचा युक्तीवाद व न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे ग्राह्य धरले गेल्याने न्यायालयाच्या आदेशाने कुलथे यांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे वकीलांची फी म्हणून 24 हजार 482 रुपये अॅड. गांधी यांना देणे अपेक्षित होते. मात्र नुकसान भरपाई मिळताच संबंधिताने वकीलांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संबंधिताने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेत रविवारी सायंकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र प्रभाकर कुलथे याच्याविरोधात फसवणूकीची तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी भा.दं.वि. कलम 420 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

