अस्तगाव माथ्यावरील व्यापारी संकुलाला आग तीन दुकाने खाक; सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील अस्तगाव माथ्यावरील डॉ. घंगाळे व्यापारी संकुलाला गुरुवारी (ता. 14) रात्री शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत तीन दुकाने खाक झाली. तर डॉ. घंगाळे यांच्या बाह्य रुग्ण कक्षाचे मोठे नुकसान झाले. या दुकानातील सर्व माल जळून गेल्याने दुकानदारांचे 11 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अस्तगाव माथ्यावर सहा महिन्यांपूर्वी डॉ. घंगाळे शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्याने उभारण्यात आले आहे. पत्र्यांचे गाळे करण्यात आले आहेत. या व्यापारी संकुलात 10 ते 12 दुकाने आहेत. गुरुवारी रात्री एकच्या सुमारास शौर्य फूटवेअर या दूकानातून आग बाहेर येताना काही कावड घेऊन जाणारे पिंप्रीनिर्मळ येथील भाविकांना दिसले. त्याचबरोबर ही आग झपाट्याने वाढत दोन्ही बाजूंच्या दुकानांमध्ये पोहोचली. त्यामुळे काचांचा तडकण्याचा मोठा आवाज येत होता. हा आवाज ऐकून शेजारीच डॉ. घंगाळे यांचे निवासस्थान असल्याने त्यांच्या पत्नी हिराबाई यांना आवाज आला. कुणी चोर शिरले का? किंवा आवाज कशाचा या कुतूहलापोटी त्या झोपेतून उठून बाहेर आल्या.

काही दुकानांना आग लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी त्यांचा मुलगा संतोष यास कल्पना दिली. संतोष यांनी राहाता नगरपालिका, शिर्डी येथील अग्निशमन यंत्रणेला याबाबत कळविले. तसेच पिंप्रीनिर्मळ येथील घोरपडे नामक एका कावड घेऊन जाणार्‍या भाविकाने विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेला कल्पना दिली. काही वेळेतच प्रवरा, राहाता व शिर्डी येथील अग्निशमन यंत्रणा दाखल झाली. या तीनही अग्निशमन यंत्रणांनी आग वेळीच आटोक्यात आणली.

यूनिक प्रोफेशनल हेअर सलून, शौर्य फूटवेअर आणि अवनी कलेक्श व ब्युटिक ही तिन्ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. गणेशनगर येथील विशाल प्रकाश गायकवाड यांच्या मालकीचे यूनिक प्रोफेशन हेअर सलून हे सलूनचे दुकान डेकोरेट केलेले होते. तेही या आगीत भस्म झाले असून, त्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. शौर्य फूटवेअरही त्यांच्या मालकीचे होते. याच दुकानात पहिल्यांदा आग लागल्याचे सांगण्यात येते. या दुकानात 4 लाखांचा माल होता असे या दुकानदारांकडून सांगण्यात आले. तर पूर्व बाजुला अवनी कलेक्शन आणि ब्युटिक हे दुकान होते. बचत गटाचे कर्ज काढून हे दूकान चार-पाच महिन्यांपूर्वी थाटले होते. त्यात कटलरी, कपडे, लेडिज वेअर, किड्ज वेअर, शिलाई मशिन आदी महत्वाचे साहित्य होते. सुलोचना गणेश वादे यांच्या मालकीचे असलेले हे दुकान या आगीत भस्मसात झाले. त्यांचे चार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुकानाला लागूनच या संकुलाचे मालक डॉ. घंगाळे यांचा दवाखाना आहे. यालाही या आगीचा फटका बसला. त्यांची 22 हजार रुपये किंमतीची खुर्चीसह इतर वस्तू जळाल्या. यात त्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या जळीताची खबर संतोष घंगाळे यांनी राहाता पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आहे. सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले. पोलीस नाईक बाबा सांगळे, कदम अधिक तपास करत आहे.

Visits: 124 Today: 2 Total: 1106095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *