आणखी दोन वर्षे मनुष्य जातीवर पिडा राहणार! कोपरगावच्या बिरोबा महाराज यात्रेतील भाकित


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
आगामी काळातील हवामान, पीक-पाण्याच्या स्थितीसह संकटांचे भाकित वर्तविण्यासाठी अनेक गावांतील यात्रा ओळखल्या जातात. त्यामुळे राज्यातील अशा अनेक ठिकाणी वर्तविण्यात येणार्‍या भाकितांचे अर्थ सध्याच्या परिस्थितीशी जुळवून लावले जातात. अर्थात यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोपरगावमधील वीरभद्र उर्फ बिरोबा महाराज यात्रेतील भाकिताकडेही असे लक्ष लागलेले असते. नुकत्याच पार पडलेल्या या यात्रेत जगात माणसांवर आलेले संकट आणखी दोन वर्षे राहण्याचे भाकित करण्यात आले आहे. त्याचा संबंध सध्याच्या कोरोना माहामारीशी जोडला जाऊ लागला आहे.

भोजडे येथील देवाचे भक्त (भगत) रामदास मंचरे यांनी हे भाकित केले आहे. त्यांनी म्हटले आहे, आगामी वर्षात ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडेल. जनावरांच्या चार्‍यांची सोय होईल. पिवळ्या रंगाच्या वस्तूंना महागाई राहील, आषाढ महिन्यात पंधरा दिवस अगोदर पाऊस लांबणार आहे. कमीत कमी दोन वर्षे मनुष्याला पिडा राहील. जगाच्या कानाकोपर्‍यात आपत्ती येईल, असे भाकित रामदास मंचरे यांनी वर्तवले असल्याची माहिती कांतीलाल मैदड यांनी दिली.

कोरोनाच्या खंडानंतर यावर्षी चंपाषष्ठीला पारंपरिक पद्धतीने यात्रा साजरी झाली. यावर्षी भगूर, हनुमंतगाव, धोत्रे, भोजडे नागमठाण, वैजापूर व कोपरगाव येथील भक्त काठ्या घेऊन बिरोबा दर्शनासाठी आले होते. त्यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी पारंपारिक पद्धतीने देवाची ओवाळणी केली. धनगरी ओव्या म्हटल्या गेल्या. डफ वाजून नृत्य करण्यात आले. महाआरती आणि महाप्रसादही झाला. कोपरगाव शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची चंपाषष्ठीनिमित्त ही यात्रा साजरी केली जाते. त्यामध्ये हे होईक म्हणजे भविष्य वर्तविण्याची प्रथा आहे. यंदाची यात्रा ही शतकोत्तर उत्सवाची होती.यात्रेची मिरवणूक झाल्यानंतर वीरभद्र महाराजांना साकडे घालून जाब विचारण्याची प्रथा आहे. गुरुवार, रविवार पौर्णिमेच्या दिवशी ही वीरभद्र महाराज यांना जाब विचारला जातो. त्याला उत्तर देताना हे भाकित केले जाते. त्याला परिसरात महत्व आहे. यावेळी भक्त सुदाम बुट्टे, आप्पा बुट्टे, विठ्ठल, राजेंद्र, रामदास आदमाने, दीपक, संतोष, दत्ता, शुभम, तेजस मैंदड उपस्थित होते.

Visits: 3 Today: 1 Total: 29240

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *