साईंच्या झोळीत 4 कोटी 57 लाखांचे घसघशीत दान पत्रकार परिषदेत संस्थान अध्यक्ष आशुतोष काळेंची माहिती
नायक वृत्तसेवा, शिर्डी
संपूर्ण विश्वाला श्रध्दा आणी सबुरीचा उपदेश देणार्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या तीन दिवसीय श्रीराम नवमी उत्सवात दोन वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच 3 लाख भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली असून श्री साईबाबांच्या दानपेटीत 4 कोटी 57 लाख 91 हजार रुपयांचे घसघशीत दान प्राप्त झाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी दिली.
दरम्यान यासंदर्भात शुक्रवारी (ता. 15) श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी श्री साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील साईअतिथी गृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, 9 ते 11 एप्रिल दरम्यान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेला श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात देश-विदेशातील लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावून श्री साईसमाधीचे दर्शन घेतले. या तीन दिवसीय उत्सवात सुमारे 3 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
साईसंस्थानच्या द्वारावती भक्तनिवास, साईआश्रम, सेवाधाम याठिकाणी 18 हजार भाविकांनी निवास केला. यादरम्यान राज्यातून तसेच परराज्यातील 53 पालख्या आल्या होत्या. यामध्ये 10 हजार भाविकांची उपस्थिती होती. या पदयात्रीसाठी साईआश्रम धर्मशाळा येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. 2 लाख 20 हजार लाडू प्रसादाची विक्री झाली. तर साईप्रसादालयामध्ये 1 लाख 45 हजार 594 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. तसेच 1 लाख 15 हजार नाष्टा पाकिटे वाटप करण्यात आली.
किती आहे सोनं, चांदी अन् परकीय चलन?
देणगी स्वरूपात रोख रक्कम सुमारे 4 कोटी 26 लाख रुपये दानपेटीत जमा झाले. त्याचप्रमाणे 15 लाख 64 हजार 205 रुपये किंमतीचे 332.680 ग्रॅम वजनाचे सोने दान आले आहे. 4 लाख 50 हजार 546 रुपये किंमतीचे 7 हजार 673 ग्रॅम वजनाची चांदी दान आली आहे. 11 लाख 20 हजार 226 रुपये परकीय चलन प्राप्त झाले आहे, असे एकूण 4 कोटी 57 लाख 91 हजार 187 रुपयांचे घसघशीत दान श्री साईसंस्थानच्या दानपेटीत जमा झाले असल्याची माहिती नामदार काळे यांनी दिली.