संगमनेरातील मंगल कार्यालयावर पहिली दंडात्मक कारवाई! कोविडचे नियम तोडणार्या घुलेवाडीच्या अमृता लॉन्सला करण्यात आला विस हजारांचा दंड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पाच दिवसांत देशभरासह राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत एकसारखी वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे देशात कोविडची दुसरी लाट आल्याची चर्चा सुरु झाली असून ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशही जारी केले आहेत. या आदेशान्वये मोठी गर्दी होणार्या लग्न समारंभ व अंत्यविधीसारख्या कार्यक्रमांसाठी उपस्थितीवर मर्यादा आल्या असून उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे आदेशही बजावण्यात आले आहेत. त्याचा पहिला परिणाम आज संगमनेरात दिसून आला. नियमांकडे दुर्लक्ष करुन केवळ आपल्या तुंबड्या भरण्यात मश्गुल असणार्या आणि सामाजिक सुरक्षेकडे दुर्लक्ष करणार्या एका लॉन्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमांचा भंग केल्याने एखाद्या मंगल कार्यालयावर अशी कारवाई होण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ असल्याने मंगकार्यालय चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

भारतात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सार्वजनिक वावर करतांना नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आटोक्यात आलेल्या कोविडचा पुन्हा उद्रेक होण्यासारखी स्थिती निर्माण झाली असून गेल्या पाच दिवसांत देशासह राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागल्याने देशात कोविडची दुसरी लाट सुरु झाल्याचे बोलले जावू लागले आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप शासनस्तरावरुन दुजोरा मिळालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधतांना नागरिकांकडून नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निरीक्षण नोंदवितांना गर्दी होणार्या सर्वच कार्यक्रमांमधील उपस्थितीवर प्रतिबंध लावले आहेत. याउपरांतही नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

गेल्या 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, जिल्हा कोविड रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या इमारती व तेथील सामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश बजावले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकार्यांच्या जबाबदार्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका हद्दितील विवाह सोहळे व अंत्यविधी अशा मोठी गर्दी होणार्या कार्यक्रमांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

या दोन्ही कार्यक्रमांना पन्नास पेक्षा कमी उपस्थितीचे नियम लागू झाले असून लग्न सोहळ्यात निश्चित संख्येपेक्षा जास्त उपस्थिती नसावी याची जबाबदारी संबंधित लॉन्स वा मंगल कार्यालय चालकांवर सोपविण्यात आली आहे. यासोबतच या अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणार्या प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर व सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. यावर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकार्यांना आदेशित करण्यात आले आहे.

त्यानुसार आज (ता.22) संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी काही ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबविली. यावेळी घुलेवाडीतील अमृता लॉन्समध्ये सुरु असलेल्या एका विवाह सोहळ्यात कोविड नियमांची सर्रास पायमल्ली झाल्याचे निरीक्षण या अधिकार्यांनी नोंदविले. तेथे नियमापेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीसह मुखपट्टी शिवाय वावरणार्यांची मोठी संख्या आणि सामाजिक अंतराची एैशीतैशी दिसून आल्याने अमृता लॉन्सच्या चालकावर 20 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने तालुक्यातील मंगल कार्यालय चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यास अनेकअंशी नियमांकडे दुर्लक्ष करुन झालेले विवाह सोहळे कारणीभूत आहेत. असे असतांनाही केवळ तुंबड्या भरण्यात मश्गुल असलेले काही लॉन्स अथवा मंगल कार्यालय चालक पैशाच्या हव्यासापोटी संपूर्ण समाजाचेच आरोग्य धोक्यात आणू पहात आहेत. अशा कारवायातूनच त्यावर प्रतिबंध निर्माण होवू शकतो, त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांच्या हितासाठी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता नियम तोडणार्यांविरोधात अशाच पद्धतीने कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

