संचारबंदी नव्हे चक्क संगमनेरच्या हमरस्त्यावरील शुकशुकाट! उष्णतेच्या झळांनी बाजारपेठा ओस; व्यापार्‍यांना दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांनंतर व्यापार-उदीम रुळावर येत असतांना आकाशातील सूर्य आग ओकू लागल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. लग्नसराईचा काळ पाहून व्यापार्‍यांनी आपापल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरुन ठेवला खरा, मात्र उष्णतेच्या तीव्र झळा टाळण्यासाठी ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नसल्याने व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. पुढील काही दिवस उष्णतेचा अंमल टिकून राहणार असल्याचा अंदाज असल्याने बाजारपेठांमधील शुकशुकाट कायम राहणार असल्याचे स्पष्ट आहे, त्यामुळे व्यापार्‍यांना आणखी काही दिवस ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मागील दोन वर्ष संपूर्ण जगाने कोविड संक्रमणाचा भयानक काळ सोसला. या कालावधीत टाळेबंदी, निर्बंध यासारख्या गोष्टींसह संक्रमणाच्या भीतीने नागरिक केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकडेच वळाल्याने उर्वरीत व्यापार्‍यांची अवस्था अवघड होवून बसली. त्यातच तब्बल दोन वर्ष सण-उत्सवांसह विवाह सोहळ्यांवरही मर्यादा आल्याने त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर झाला. या कालावधीत जवळपास घराघरात कोविड बाधीत आढळल्याने बहुसंख्य नागरीकांचा पैसा उपचारांमध्येच खर्च झाला. त्यातून सावरल्यानंतरही सामान्य माणसांजवळ पैसाच नसल्याने त्याने बाजारपेठेकडे पाठ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कर्ज काढून दुकानात माल भरणार्‍या छोट्या व्यापार्‍यांसाठी हा संपूर्ण कालावधी मोठ्या संघर्षाचा आणि नुकसानदायी ठरला.

मागील दोन महिन्यांपासून देशातील संक्रमणाला ओहोटी लागली आहे. लसीकरणाची आकडेवारीही समाधानकारक झाल्याने केंद्र व राज्य सरकारांनी टप्प्याटप्प्याने निर्बंध मागे घेत ते संपुष्टात आणले. त्यामुळे ठिकठिकाणच्या व्यापार्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. प्रस्थापित व्यापार्‍यांसाठी कोविडचा कालावधी शांततेचा ठरला असला तरीही तो सहन करण्याची क्षमता असल्याने त्यातून सावरण्यास त्यांना फारकाळ लागला नाही. मात्र छोट्या व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय त्रासदायक आणि आर्थिक संकटात ढकलणारा ठरला. निर्बंध हटल्यानंतर अशा असंख्य छोट्या-छोट्या व्यापार्‍यांनी कर्ज, उसनवारी करुन आपली दुकाने मालाने भरली आणि ग्राहकांची प्रतीक्षा सुरु झाली.

मात्र यंदा जागतिक तापमानवाढीचे संकट कोसळल्याने त्यांच्या अपेक्षांवर एकाप्रकारे पाणी फेरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अर्थात संगमनेर तालुक्यातील तापमानाने अद्यापपर्यंत उच्चांक गाठलेला नाही, मात्र दुपारी 11 वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचंड उकाडा जाणवत असल्याने ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा परिणाम छोट्या व्यापार्‍यांवर होत असून कोविडच्या संकटानंतर आता तापमानाचे संकट उभे राहिल्याने व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. सध्या जाणवत असलेल्या उष्णतेचा अंमल पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेल्याने तूर्त तरी या व्यापार्‍यांची या दृष्टचक्रातून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे.

ऐतिहासिक महत्त्वासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला आयाम देणार्‍या संगमनेरच्या बाजारपेठेत कोविडनंतर आता उष्णतेमुळे शुकशुकाट जाणवत आहे. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याने ग्रामीण भागातील माणसं संगमनेरात येत नसल्याचे चित्र सध्या शहराच्या हमरस्त्यासह जूनी बाजारपेठ, नवीन नगर रोड व बसस्थानकाच्या परिसरातील निर्मनुष्य व ओस पडलेल्या रस्त्यांवरुन दिसून येते. पुढील काही दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार असल्याचा अंदाज असल्याने संगमनेरातील व्यापार्‍यांना आणखी काही दिवस ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Visits: 10 Today: 2 Total: 29672

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *