प्रवरा पुलावर अडकलेल्या तरुणासाठी पोलीस ठरले देवदूत! ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवून सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश

नायक वृत्तसेवा, अकोले
अत्यंत रहदारी असणार्या देवठाण रस्त्यावरील प्रवरा पूल स्तंभावरील मोहळ काढण्यासाठी गेलेला तरुण अडकून पडला. त्यास बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी शुक्रवारी (ता.15) सायंकाळी 7 वाजता ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवून सुखरूपपणे बाहेर काढले. यामुळे त्या तरुणासाठी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस ‘देवदूत’च ठरले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रवरा नदी पुलाच्या स्तंभावरील मोहळ काढण्यासाठी आदिवासी तरुण शुक्रवारी सकाळी गेला होता. मोहळ काढल्यानंतर तो तेथेच अडकून पडला. अथक प्रयत्न करुणही त्यास वर येता आले नाही. हा संपूर्ण प्रकार पुलाजवळ असलेल्या फॅब्रिकेशन दुकानदाराने पाहिला. त्यानंतर ही वार्ता वार्यागत पसरताच पुलावर ये-जा करणार्यांसह शहरातील नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, त्यास बाहेर काढण्यास कोणीही धजावले आहे. अखेर या गर्दीतीलच युवा नेते बाबासाहेब आभाळे व उद्योजक साहेबराव नवले यांनी धाडस दाखविले.

त्यांनी मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अकोले तालुका कार्याध्यक्ष सुरेश नवले यांना संपर्क केला. त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन करण्यास होकार दर्शविला. तोपर्यंत बाबासाहेब आभाळे व साहेबराव नवले यांनी दोन युवकांना घेऊन अडकलेल्या तरुणास बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तितक्यात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अखेर सर्वांच्या मदतीने त्या तरुणास रेस्क्यू ऑपरेशन करुन संध्याकाळी सात वाजता बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, या अडकलेल्या तरुणाकडे कदाचित कोणाचेही लक्ष गेले नसते तर तो बिना अन्नपाण्याचा रात्रभर तेथेच राहिला असता. परंतु, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस त्याच्यासाठी देवदूतासारखे धावून आले.
