सोयाबीनची चोरी करणाऱ्या सहा आरोपींच्या आवळल्या मुसक्या! 19 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त ; अकोले पोलिसांची दमदार कामगिरी..

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यात शेतकऱ्यांची तयार केलेली सोयाबीन चोरी जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत दाखल गुन्ह्यांचा पोलीस तपास करत होते. अखेर यातील आरोपींना शोधण्यात अकोले पोलिसांना यश आले असून, सहा आरोपींना अटक करुन 19 लाख 25 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
सोयाबीन चोरीच्या घटनांची खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दखल घेऊन सखोल तपास करण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार अकोले पोलीस कसोशीने यातील आरोपींचा शोध घेत होते. अखेर रविवारी (ता.6) गुप्त खबऱ्याकडून सोयाबीन चोरी करुन तिची विक्री करण्याच्या वास्तव्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून अजय बाळू मेंगाळ (रा.गर्दणी), लहू वाळीबा मेंगाळ (रा.तांभोळ), विजय अशोक खोडके (रा.खानापूर), भीमराज गंगाराम मेंगाळ (रा.खानापूर) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना ताब्यात घेऊन गुरनं. 29/2022 भा.दं.वि. कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता.10) पोलीस कोठडी सुनावली होती.

या कोठडी कालावधीमध्ये आरोपींना विश्वासात घेवून इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्यांनी मयूर लहानू मुर्तडक (रा.राजूर) व नंदू रामा भले (रा.दिगंबर, राजूर) या दोघांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीची 25 क्विंटल सोयाबीन देखील जप्त करण्यात आली असून चोरी करताना वापरलेली पिकअप वाहने (एमएच.12, डीटी. 4108) 5 लाख रुपये, दुसरा पिकअप (क्र. एमएच.26, एच.9193) 7 लाख रुपये, तिसरा पिकअप (क्र.एमएच.14, एझेड.0511) 6 लाख रुपये आणि 25 हजार रुपये किंमतीची बजाज डिस्कवर मोटारसायकल (क्र.एमएच.17, एपी.1374) असा एकूण 19 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जप्त मुद्देमालातील पिकअप (एमएच.12, डीटी.4103) ही विजय अशोक खोडके व भीमराज गंगाराम मेंगाळ यांनी ओतूर (ता.जुन्नर, जि.पुणे) येथून चोरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ओतूर पोलिसांत गुरनं.29/2022 भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरील सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून इतरही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मिथून घुगे, उपनिरीक्षक भूषण हंडोरे, सहा.फौजदार मैनुद्दीन शेख, पोहेकॉ.लांडे, महिला पोना. संगीता आहेर, पोकॉ.अविनाश गोडगे, सुयोग भारती, आनंद मैड, विजय आगलावे, अशोक गाडे, पोना.फुरकान शेख यांनी केली आहे. पुढील तपास अकोले पोलीस करत असून, या धडाकेबाज कामगिरीचे शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे.

