उत्तर नगर जिल्ह्यातील तालुक्यांत भूकंपसदृश्य धक्के नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण; कोणतीही हानी नाही
नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेमधील अनेक तालुक्यांत मंगळवारी (ता.22) रात्री नऊ ते साडेनऊ वाजे दरम्यान भूकंपसदृश्य सौम्य धक्के जाणवले आहे. राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव व पंचक्रोशीमध्ये मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्यानंतर नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अचानक खिडक्या, दारं, पत्रे वाजल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, भूकंपसदृश्य धक्के जाणवल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. याबाबत कोणी म्हणतं की भूकंपाचे धक्के आहे तर कोणी म्हणतं लष्कराचा सराव सुरू असल्याने अशी सौम्य धक्के जाणवले आहेत. मात्र, खरंच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले का आणि भूकंपाचे सौम्य धक्के बसले असेल तर याची रिश्टर स्केलमध्ये तीव्रता किती? हा देखील प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता.
याबाबत प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान शास्त्र विभागाच्यावतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खरंच भूकंपाचे सौम्य धक्के बसले का की इतर काही कारणामुळे भूकंपसदृश्य धक्के जाणवले याबाबतची अधिक माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळू शकेल.