‘पसायदाना’चा यशवंत प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद ः मंडलिक यशवंत प्रतिष्ठानच्यावतीने पसायदान भित्तीपत्रिका वाटप
नायक वृत्तसेवा, नेवासा
पसायदान शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा यशवंत प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
नेवासा येथील यशवंत प्रतिष्ठानच्यावतीने नेवासा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना पसायदान भित्तीपत्रिका वाटप करण्यात आले. या भित्ती पत्रकाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख म्हणाले, संपूर्ण जगाची विश्व प्रार्थना असलेल्या पसायदानाची निर्मिती ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा येथे केली आहे ही नेवासकरांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे. नवीन पिढीला पसायदान अर्थासहीत माहिती व्हावे यासाठी पसायदान भित्तीपत्रिकेचे वाटप उद्धव महाराज मंडलिक यांच्या आशीर्वादाने करत आहोत. यापुढेही नेहमी यशवंत प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी तत्पर राहू आणि या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन केले.
यावेळी यशवंत स्पोर्ट्स क्लब नेवासा येथील राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या रक्षा खेनवर, राधिका हेडे, ऋतुजा कुंभार, प्रणिता रोडे, तनुश्री बिडवई, निरल मांदळे यांचा व प्रशिक्षक पापा शेख यांचा उद्धव महाराज मंडलिक व उदयन गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल कुकाणा, न्यू इंग्लिश स्कूल पाथरवाला, न्यू इंग्लिश स्कूल सलाबतपूर, अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय देडगाव, श्री शनिश्वर माध्यमिक विद्यालय सोनई, स्वामी विवेकानंद विद्यालय मोरयाचिंचोरे यांना प्रतिनिधी स्वरूपात भित्तीपत्रिका वाटप करण्यात आले.